मुंबई: अपवित्र आत्मा बाहेर काढण्याच्या बहाण्याने 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार; पुजाऱ्याला अटक
ही घटना मुंबई (Mumbai) येथील चारकोप ( Charkop) परिसरात घडली आहे.
घरात सुख, समृद्धी आणि व्यवसायवृद्धीसाठी पुजा करण्याच्या बाहण्याने 21 वर्षीय गायिकेवर पुजारीनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील चारकोप ( Charkop) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुजाऱ्याला ताब्यात घेतले असून यासंदर्भात अधिक चौकशी करत आहेत. पीडित महिलेच्या शरिरात अपवित्र आत्मा असल्याची भीती घालत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. परंतु, आपल्यासोबत चुकीचा प्रकार घडला आहे, असे पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने हा सर्वप्रकार आपल्या पतीच्या कानावर घातला. त्यानंतर पीडिताच्या पतीने चारकोप पोलीस ठाण्यात जाऊन पुजारीविरोधात तक्रार दाखल केली.
पीडिता आणि तिचा पती काही महिन्यांपूर्वी गृहप्रवेशाच्या पूजेसाठी ज्योतिषाच्या शोधात होते. व्यावसायिक पातळी फारशी भरभराट नसल्याने दोघांनी एका मित्राची मदत मागितली होती. तेव्हा, समृद्धी आणि व्यवसायवृद्धीसाठी घरात होमहवन करण्याचा सल्ला त्यांना मिळाला. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपी उमेश पांडेशी दोघांची ओळख झाली. त्यानुसार, पीडिताने रविवारी पांडेला पूजेसाठी घरात बोलावले. दरम्यान, पूजेचे साहित्य आणण्यासाठी पती बाहेर गेला. त्यावेळी पांडे पीडितला म्हणाला की, “तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे. त्यामुळे तुम्हाला व्यावसायिक वृद्धी नाही, अपयश येत आहे. शरीरातील अपवित्र आत्मा बाहेर काढण्यासाठी तुला निर्वस्त्र व्हावे लागेल,” असे पांडे यांने पीडितेला सांगितले. त्यानंतर याचीच भीती घालून पीडितेवर बलात्कार केला. हे देखील वाचा- इंदापूर: शिवशाही बसने 3 वर्षाच्या चिमुकलीला चिरडले; वाहनचालकावर गुन्हा दाखल
पीडित गायिका ही रिमिक्स अल्बमसाठी काम करते, तर तिचा पती संगीतकार आहे. दोघेही चारकोप परिसरात भाड्याच्या घरात राहतात. पीडितेच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने पुजाऱ्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.