सिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील 90 तर राजस्थानातील 80 विद्यार्थ्यांची सुटका

सिमल्याचे पोलिस अधीक्षक ओमपती जमवाल यांनी सांगितले की, महाराष्ट्र तसेच राजस्थानमधून शुक्रवारी हे विद्यार्थी हिमाचल प्रदेशमध्ये सहलीसाठी आले होते. हे विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी कुफ्री येथे झालेल्या बर्फवृष्टीत अडकले.

Snow Fall in Shimla प्रतिकात्मक फोटो (PC - ANI)

सिमला (Shimla) जिल्ह्यातील कुफ्री येथील बर्फवृष्टीत अडकलेल्या महाराष्ट्रातील 90 तर राजस्थानमधील 80 विद्यार्थ्यांची शनिवारी सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सिमल्याचे पोलिस अधीक्षक ओमपती जमवाल यांनी सांगितले की, महाराष्ट्र तसेच राजस्थानमधून शुक्रवारी हे विद्यार्थी हिमाचल प्रदेशमध्ये सहलीसाठी आले होते. हे विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी कुफ्री येथे झालेल्या बर्फवृष्टीत अडकले.

तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस मनाली येथे जात असताना कुफ्रीजवळील फागू येथे घसरली. त्यानंतर हे विद्यार्थी बर्फात अडकून पडले. त्यानंतर ढालीचे एसएचओ राजकुमार व त्यांच्या पथकाने या विद्यार्थ्यांची सुटका केली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या रिसॉर्टवर सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आले. (हेही वाचा - जम्मू-कश्मीर: लडाखमध्ये झालेल्या तुफान बर्फवृष्टीत 10 लोक अडकले; सर्च ऑपरेशन सुरु)

एसएचओच्या पथकाला कुफ्री भागात दोन पर्यटन बस अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. हसन व्हॅलीपासून सुमारे अर्धा किलोमीटर दूर असलेल्या पर्यटक बसमध्ये राजस्थानमधील विद्यार्थ्यांसह 35 मुलींचा समावेश होता. नायब तहसीलदार गेझाटा यांनी रात्री संपूर्ण समन्वय साधत त्याठिकाणी बुलडोजर आणला. त्यानंतर बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली.