Naxalites Encounter: गडचिरोलीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 800 जवानांकडून ऑपरेशन
त्यापूर्वीच सुरक्षा दलाच्या जवानांनी ही मोठी कारवाई केली आहे. या ऑपरेशमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या नक्षल (Naxalite) चकमकीत 8 नक्षली ठार झाले आहेत. नक्षलग्रस्त भागातील या चकमकीनंतर जवान मुख्यालयी परतत आहेत. ह्या दरम्यान इंद्रावती नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत पोलीस जवान नक्षल्याचे मृतदेह आणि नक्षल साहित्य खांद्यावर घेऊन जात असताना दृश्यामध्ये दिसत आहेत. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर (maharashtra-chhattisgarh border) नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत (chhattisgarh naxalites encounter) ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेली ही चकमक अखेर आज संपली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. (हेही वाचा - Naxalites Killed In Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; चकमकीत 7 नक्षलवादी ठार, शोध मोहीम सुरू)
छत्तीसगडमध्ये येत्या 25 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सुरक्षा दलाच्या जवानांनी ही मोठी कारवाई केली आहे. या ऑपरेशमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश मिळाले आहे. नारायणपूर अबुझमाडच्या सीमावर्ती भागातील रेकाव्याच्या जंगलात कालपासून सुरू असलेली पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक संपली. या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या सर्वांचे मृतदेह सापडले असून चकमकीनंतर पोलीस व सैन्याचे जवान मृतदेह घेऊन मुख्यालयाकडे परतत आहेत.
या कारवाईत तीन जिल्ह्यांतील पोलीसही सहभागी झाले होते, हे संयुक्त ऑपरेशन होते. डीआरजी, बस्तर फायटर आणि एसटीएफच्या 800 जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. नक्षलवाद्यांना पळून जाण्याचा मार्गही नव्हता. आयईडी पेरल्यानंतर ते घनदाट जंगलात लपून बसले होते आणि छुप्या पद्धतीने गोळीबार करत होते, पण त्यांना त्यांच्या मनसुब्यात यश आले नाही. नक्षलवाद्यांची संख्या आणि कारवाया पाहून जवान सतर्क होते, अखेर त्यांनी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, नक्षलवादी मोहिमेअंतर्गत छत्तीसगड सरकारही नक्षलवाद्यांवर सातत्याने कारवाई करत आहे.