धक्कादायक : मुंबईमधील 74 टक्के रेस्टॉरंट्स अस्वच्छ; FDA ने बजावली नोटीस
नुकत्याच केलेल्या पाहणीतून नामांकित पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वयंपाकगृहात मूलभूत स्वच्छता, अन्नसेवेचा दर्जा निकृष्ट झाला असल्याचे आढळून आले आहे
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, व्यस्त वेळापत्रकात रांधा-वाढा-उष्टी काढाचे व्याप कोण करत बसलय. अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व गोष्टी बाहेर उपलब्ध आहे.. त्यामुळे आजकाल मंडळी घराच्यापेक्षा बाहेरच खाण्याला प्राधान्य देतात. मात्र तुम्हाला माहीत आहे, मुंबईसारख्या शहरात तब्बल 74 टक्के रेस्टॉरंट्समध्ये अस्वच्छ अन्न पुरवले जाते. डिलिव्हरी बॉयने चोरून पदार्थ खाणे, लोणावळ्याची प्रसिद्ध मगनलाल चिक्की बंद होणे अशा घटनानंतर,अन्न व औषध प्रशासन विभागा (Food and Drug Administration) ने नुकत्याच केलेल्या पाहणीतून नामांकित पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वयंपाकगृहात मूलभूत स्वच्छता, अन्नसेवेचा दर्जा निकृष्ट झाला असल्याचे आढळून आले आहे.
अनेक हॉटेल्समध्ये अन्नाच्या सुरक्षेबाबतचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर एफडीएने शहर-उपनगरातील 442 रेस्टॉरंट्स-हॉटेल्सची तपासणी केली असता, त्यातील 327 रेस्टॉरंट्स-हॉटेलमधील किचन अस्वच्छ आढळले. तसेच अनेक ठिकाणी अन्नाच्या स्वच्छतेबाबत कोणतेही नियम पाळले जात नसल्याची बाब समोर आली. म्हणूनच आता राज्यातील तब्बल 2 हजार 600 पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना स्वयंपाकगृहाच्या स्वच्छतेपासून अन्य सेवांचा दर्जा सुधारण्याविषयी आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा : पुण्यातील वैशाली-रुपाली-गुडलकसह अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंट्स ठरली अस्वच्छतेत नंबर 1)
रेस्टॉरंट्स-हॉटेल्स अक्षरशः ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत, म्हणूनच आता एफडीएची यांवर करडी नजर असणार आहे. दरम्यान अशा रेस्टॉरंट्स-हॉटेल्सवर आता कडक कारवाई होणार आहे. पहिल्यांदा त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे, ही नोटीस पाठवूनही जर त्यांनी योग्य अंमलबजावणी न केल्यास या बड्या रेस्टॉरंट-हॉटेल्सचा परवाना रद्द किंवा निलंबित करण्यात येणार आहे. मात्र याबाबतीत ग्राहकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. अन्नाची सुरक्षा अथवा स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेतली जात नसल्याबद्दल कोणतीही गोष्ट आढळ्यास त्यांनी त्याबद्दल तक्रार करणे गरजेचे आहे.