State Department of Tourism Directorate : राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालयाला 68 लाखांचा गंडा, बनावट चेकद्वारे लुटले
बनावट चेक वापरून राज्याच्या पर्यटन संचालनालय विभागाची तब्बल 68 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
State Department of Tourism Directorate : राज्याच्या पर्यटन संचालनालय विभागाच्या बँक खात्यातून तब्बल 68 लाख रुपये काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. आकाश डे, तपन मंडल, लक्ष्मी पाल, आनंद मंडल अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राज्य पर्यटन संचालनालयाच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सोमवारी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर 34,419, 420,465,367,468, 471,473, भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा :Online Classes Fraud: 'ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली 64 लाख रुपयांचा गंडा)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालय विभागाच्या बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखेतून 15 बोगस चेक्सवर बोगस शिक्के व बोगस सह्या करून हे पैसे वळवले होते. त्यांनी एकूण 68 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. व्यवहारात गोंधळ दिसताच पर्यटन विभागाने तत्काळ संबंधित बँकेला माहिती दिली आणि पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या मुख्यालयातून बोगस शिक्के आणि सह्या बाहेर प्रसारित झाल्याचे म्हटले होते. त्यात आता ही घटना समोर आली आहे. (हेही वाचा : Thane Cyber Fraud: ठाणे येथे MNC कंपनीचा MD सायबर चोरांच्या गळाला, कस्टम अधिकारी असल्याचे सांगून 4.80 कोटी रुपयांचा गंडा)
बोगस चेकद्वारे काढण्यात आलेल्या पैशांपैकी आरोपी आकाश डे याच्या खात्यावर 22 लाख 79 हजार, तपन मंडल 2 लाख 73 हजार, लक्ष्मी पाल- 13 लाख 91 हजार , आणि आनंद मंडल याच्या खात्यात – लाख 24 हजार जमा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.