Byculla Zoo : राणीच्या बागेत 50 प्राण्यांचा मृत्यू, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पण राणीच्या बागेतून तब्बल ३० प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २०२२-२३ या वर्षात ही घटना घडली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणातून ही माहिती उघड झाली आहे.

Byculla Zoo (PC - flickr)

Byculla Zoo : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहलयात ५० प्राणी आणि पक्षांचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तब्बल ३० प्राण्यांचा ह्रदयविकारामुळे (cardiac arrest )  मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्यानातील प्राण्यांच्या देखरेखीवर आणि सोयी-सुविधांवर प्राणी प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातील प्राणिसंग्रहायलयातील पक्षी आणि प्राणी यांच्याबाबतचा अहवाल नुकताच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये २०२२-२३ या वार्षिक अहवालात कोणत्या प्राण्यांचा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहलयातील (veermata jijabai bhosale udyan) प्राण्यांचा हृदयाचा झटका, श्वसनक्रिया बंद होणे(respiratory failure) आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या विविध आजारांनी बळी गेल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे. (हेही वाचा : Mumbai: भायखळा प्राणीसंग्रहालयात वर्षाच्या पहिल्याच दिवशी 32,820 पर्यटकांची विक्रमी नोंद)

१ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत राणीच्या बागेतील ५० प्राणी, पक्ष्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ३० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहीती वार्षिक अहवालातून समोर आली आहे. प्राणी संग्रहालयात पेंग्विन, वाघ, पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, विविध पक्षी आहेत. मृत प्राण्यांमध्ये ठिपके असलेले हरीण, इमू, मॅकाक रीसस, सांबर, आफ्रिकन पोपट, कासव यांचा समावेश आहे. राणीबागेतील ज्या पशू आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये पोपट आफ्रिकन ग्रे, कॉकॅटियल बडेरिगर, सांबर हरण, बडेरिगर, मॅकॉ मिलिटरी, तीतर गोल्डन, भारतीय फ्लॅपशेल, कासव, गोल्डन जॅकल, इमू इत्यादी पक्षी आणि प्राण्यांचा समावेश आहे. वृद्धापकाळाने सर्वात कमी मृत्यू झाले आहेत. मात्र सर्वाधिक प्राण्यांचा मृत्यू ह्रदयविकारामुळे का होत आहे याची कारण अद्याप समोर आलेले नाही. (हेही वाचा: Byculla Zoo: मुंबई प्राणीसंग्रहालयात दिवाळी आठवड्याच्या उत्पन्नात 138% एवढी वाढ)

एवढ्या मोठ्या संख्येने प्राण्यांच्या मृत्यूची ही पहिलीच घटना नाही. याआधी २०१९-२० या वर्षात वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात तब्बल ३२ विविध प्रकारच्या प्राण्यांचा मृत्यू झाला होता. या अहवालात पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा लेखाजोखा मांडण्यात आला होता. त्यानुसार २०१९-२० या वर्षभरात ८ पक्षी, १७ सस्तन प्राणी आणि ३० सरपटणाऱ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.