Coronavirus In Nagpur: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास 5 हजारापर्यंत दंड; नागपूर महानगरपालिकेचा मोठा निर्णय
राज्यात मुंबईसह विदर्भातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबईसह विदर्भातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. यामुळे प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. याचपार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation) महत्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तीने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेने दिली आहे.
आपण गृह विलगीकरणात असल्यास कोरोना नियमांचे पालन करीत 10 दिवस घराबाहेर पडू नये. मनपाची चमू कधीही आपल्या घरी भेट देऊ शकते. त्यावेळी आपण घरी आढळला नाही तर साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये 5 हजारपर्यंत दंड आकारण्यात येईल, असा इशारा नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना दिला आहे. नागपूरमध्ये काल (8 मार्च) 1 हजार 37 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे नागपूर येथील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 29 हजार 831 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 18 हजार 117 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 2 हजार 847 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Thane Lockdown in Hotspot: ठाणे शहरात Coronavirus हॉटस्पॉट असलेल्या 16 ठिकाणी 13 ते 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
संपूर्ण महाराष्ट्रात काल (8 मार्च) 8 हजार 744 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 9 हजार 68 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 20 लाख 77 हजार 112 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 97 हजार 637 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.