काय सांगता? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या बँक खात्यातून 47 लाख रुपये लंपास; गुन्हा दाखल, तपास सुरु
परंतु ज्या चेकद्वारे पैसे काढले गेले ते बनावट होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या धनादेशांवर विभागाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या होत्या.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या (Department of School Education and Sports) बँक खात्यातून 47 लाख रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शाळा आणि क्रीडा विभागाच्या बनावट धनादेशाचा वापर करून पैसे इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले.
मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील सूर्यकांत हंजे (57) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कार्यालय मंत्रालयात असून त्याचे नरिमन पॉइंट येथील बँकेत खाते आहे. या विभागाच्या बँक खात्यातून 10 हप्त्यांमध्ये एकूण 47.60 लाख रुपये दुसऱ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले.
याबाबत विभागाने माहिती गोळा केली असता बँकेने विभागाच्या नावाने चेकबुक दिल्याचे आढळून आले आणि त्याच चेक नंबरद्वारे पैसे हस्तांतरित केले गेले होते. परंतु ज्या चेकद्वारे पैसे काढले गेले ते बनावट होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या धनादेशांवर विभागाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या होत्या. एकूण चार खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले. पोलिसांना याबाबत तक्रार मिळाल्यावर, त्यांनी कलम 419, 420, 465, 467, 471 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोन्दवून तपास सुरु केला आहे. (हेही वाचा: Lok Shabha Elections 2024: नागरिक NGSP पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या बँक खातेधारकांच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्यांची नावे नमिता बाग, प्रमोद सिंह, तपन कुमार आणि झीनत खातून आहेत. पोलिसांनी या चौघांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून त्यांची माहिती घेतली जात आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत 2 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान हे पैसे काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख रुपये काढण्यात आले होते.