Thane पाठोपाठ नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार; 32 माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या भेटीला

ठाण्यापाठोपाठ नवी मुंबई (Navi Mumbai) मध्येही 30-32 नगरसेवक (Corporator) भेटल्याने हा शिवसेनेसाठी एकापाठोपाठ एक धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

Eknath Shinde | PC: Twitter

महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या 40 शिवसेना आमदार आणि 11 अपक्षांनी पाठिंबा काढल्याने उभी फूट पडली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील 66 माजी नगरसेवकांचा काल पाठिंबा मिळाला आणि आता ठाण्यापाठोपाठ नवी मुंबई (Navi Mumbai) मध्येही 30-32 माजी नगरसेवक (Corporator) भेटल्याने हा शिवसेनेसाठी एकापाठोपाठ एक धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. नगरसेवकांसोबतच पदाधिकार्‍यांचाही समावेश होता.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर मीडीयाशी बोलताना या नगरसेवकांनी, 'एकनाथ शिंदे कुणाचा फोन कट करत नाहीत. लहानात लहान कार्यकर्तादेखील भेटला, फोन केला तर ते भेटतात, बोलतात. त्यामुळे उर्जा मिळते' अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. हे देखील नक्की वाचा: ठाण्यात शिवसेनेला मोठा झटका; 66 माजी नगरसेवकांनी नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात केला प्रवेश .

दरम्यान आता शिवसेनेमधील गळती रोखण्यासाठी संजय राऊत नाशिक दौर्‍यावर आहेत तर आदित्य ठाकरे 'निष्ठा यात्रे'वर आहेत. आज पासून (8 जुलै) आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा सुरू होत आहे. मुंबई पासून त्याची सुरूवात होणार असून 236 शाखांना प्रत्यक्ष भेट देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये बंडखोरी झालेल्या आमदारांच्या विभागांचाही समावेश आहे.