भिवंडी जवळ एका व्यक्तीकडून 45 लाख लुटल्या संबंधी 4 जणांना अटक; त्यापैकी 3 जण पुणे पोलिस दलातील कर्मचारी
पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यातील गणेश शिंदे, गणेश कांबळे आणि दिलीप पिलाणे अशा तिघांना शनिवारी (12 मार्च) अटक करण्यात आली आहे.
औरंगाबाद (Aurangabad ) मधून मुंबई (Mumbai) ला हवाला मार्फत पैसे पुरवणार्या एका व्यक्तीला लुटलेल्यांमध्ये 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या 4 जणांमध्ये 3 जण पुणे पोलिस (Pune Police) खात्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान 45 लाख रूपये लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ठाण्यातील भिवंडी परिसरातील नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5.50 कोटी रुपये असलेल्या कारमध्ये असलेल्या या व्यक्तीला 8 मार्च रोजी मुंबई-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ चार जणांनी अडवले.
या चार आरोपींनी कारमधील व्यक्तीकडून 45 लाख रुपये काढून घेतले. 10 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी प्रथम अटक केलेली व्यक्ती बाबूभाई सोळंकी होती. त्याने आपल्या ज्या अन्य 3 साथीदारांचा वापर केला ते सारे पुणे पोलिस दलातील कर्मचारी आहेत.
पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यातील गणेश शिंदे, गणेश कांबळे आणि दिलीप पिलाणे अशा तिघांना शनिवारी (12 मार्च) अटक करण्यात आली आहे. लुटलेल्या रक्कमेतील केवळ 5 लाख रुपये आतापर्यंत जप्त करण्यात आले असून आरोपींची चौकशी करून मनी ट्रेल उलगडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.