सोलापुरात ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेले 21 वर्षीय ऋतुराज सर्वात तरुण उमेदवार, वाचा सविस्तर

सोलापूरच्या (Solapur) मोहोळ तालुक्यातल्या घाटणे येथील 21 वर्षाचा तरुण ऋतुराज रवींद्र देशमुख (Ruturaj Ravindra Deshmukh) यांनी विजय मिळवत सर्वात तरुण विजयी उमेदवार होण्याचा मान पटकवला आहे.

Ruturaj Deshmukh (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूकीत (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021) आज काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे निकाल लागला. तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल... मात्र काही निकाल असे होते जे खूपच धक्कादायक होते. त्यातीलच एक म्हणजे सोलापुरातील निकाल. सोलापूरच्या (Solapur) मोहोळ तालुक्यातल्या घाटणे येथील 21 वर्षाचा तरुण ऋतुराज रवींद्र देशमुख (Ruturaj Ravindra Deshmukh) यांनी विजय मिळवत सर्वात तरुण विजयी उमेदवार होण्याचा मान पटकवला आहे. ही बातमी ऐकून त्यांच्या गावातील सर्व लोक आणि त्यांचे कुटूंब यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

सोलापुरातील हा निकाल खूपच धक्कादायक होता. अनुभवी उमेदवारांना मागे टाकत ऋतुराजने बाजी मारली आहे. ऋतुराज सध्या 21 वर्षाचा असून नुकतेच त्याचे बीएससीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऋतुराजने आपल्या घाटणे गावात निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं होत. निवडणुकीच्या काळात ऋतुराजने तयार केलेला वचननामा चर्चेचा विषय ठरला होता.

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावची निवडणूक ऋतुराज रवींद्र देशमुख या फक्त 21 वर्षांच्या तरुणाने जिंकली. अगदी तालुक्यापर्यंत मला हरवण्यासाठी प्रयत्न झाले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो, अशी प्रतिक्रिया ऋतुराजने जिंकल्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.

हेदेखील वाचा- Maharashtra Gram Panchayat Election Result 2021: आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हा, अजित पवारांचा विजयी उमेदवारांना मोलाचा सल्ला

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवडणुकीसाठी स्वत:चा वचननामा तयार करुन गावच्या विकासाचा रोडमॅप दाखवला होता. यावेळी ऋतुराजने अनेकांची मने जिंकून घेतली होती. गावातील सामाजिक कार्यात देखील त्यांचा हातभार असायचा. त्यामुळे त्यांची एकूण कामाची पद्धत आणि जिद्द पाहून त्यांना सरपंचपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आतापर्यंत हाती लागलेल्या निकालामध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या विजयी उमेदवारांना मोलाचा सल्ला दिला आहे.