कॉंग्रेस भवनची तोडफोड करणाऱ्या संग्राम थोपटे यांच्या 19 समर्थकांना अटक; मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी
मात्र तीन वेळा आमदार झालेल्या संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांना त्यातून वगळण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी कॉंग्रेस कार्यालयाची तोडफोड केली.
नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र तीन वेळा आमदार झालेल्या संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांना त्यातून वगळण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी कॉंग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारी (31 डिसेंबर 2019) रोजी पुणे येथे घडली. याबाबत आता 19 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 कार्यकर्ते कॉंग्रेस भवनची तोडफोड करताना दिसत आहे.
कॉंग्रेस भवनची तोडफोड -
मंत्रिमंडळातील रुसवे फुगवे ही गोष्ट काही नवीन नाही. नवीन सरकार सत्तेत आल्यावर नव्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हायला वेळ लागला. त्यात भोर व्हेला तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांना आपला मंत्रीमंडळात समावेश होईल अशी आशा होती, मात्र ती फोल ठरली. यामुळे पुणे काँग्रेसमध्ये या नाराजीनाट्याचे पडसाद काहीसे आक्रमक आणि हिंसक रुपात पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील काँग्रेस नेते आमदार संग्राम थोपट यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या थोपटे यांच्या काँर्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी पुणे शहरातील काँग्रेस भवन इमारतीत तोडफोड केली.
याबाबत, नतीन सदाशिव दामगुडे (वय 30), विक्रम शिवाजी जामदार (वय 32), गणेश नामदेव जागडे (वय 32), सुमंत सुभाष शेटे (वय 36), शिवराज चंद्रकांत शेंडकर (35), महेंद्र अशोक साळुंखे (वय 30), अनिल जाणू सावन्त (वय 36), भूषण आनता खोपडे (26), जितेंद्र राजेंद्र कंक (34), गणेश बाळू मोहिते (वय 34), चंद्रकांत अनंत मळेकर (वय 51), बजरंग रामचंद्र शिंदे (वय 45), सिद्धार्थ संजय कंक (24), अभिषेक जगन्नाथ येलगुडे (वय 37), अरुण गुलाब मिलार (वय 37), राहुल पोपट जाधव (वय 38), राहुल दिलीप बोरगे (वय 33), ज्ञानेश्वर तुकाराम भोरे (वय 40) आणि महेश निवृत्ती टापरे (वय 31) अशी अटक केलेल्या आणि नंतर जामिनावर सुटका केलेल्यांची नावे आहेत. (हेही वाचा: पुणे: संग्राम थोपटे यांना मंत्रिपद डावलले; आक्रमक कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन फोडले)
याबाबत पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेतले होते. मात्र संग्राम थोपटे यांनी या तोडफोडीविषयी मला काहीच कल्पना नाही. हा प्रकार चुकीचा असल्याचं सांगत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्हीही पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. काही नेत्यांनी ही नाराजी उघड बोलून दाखवली आहे. तर, काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे.