15 ऑगस्ट पूर्वी MHADA च्या 14,261 घरांची लॉटरी; गिरणी कामगारांसाठी तब्बल 5090 घरांचा समावेश
महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मुंबईमधील गिरणी कामगारांसाठी 5090 घरांचा समावेश आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरण अर्थात म्हाडा सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देत आहे. आता पुन्हा एकदा म्हाडा नव्या घरांची सोडत काढण्यासाठी सज्ज झाले आहे. संपूर्ण राज्यातील 14,261 घरांसाठी ही सोडत काढली जाणार असून, येत्या 15 ऑगस्टपूर्वी लॉटरीची जाहिरात निघणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मुंबईमधील गिरणी कामगारांसाठी 5090 घरांचा समावेश आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
शहरनिहाय गृहसंख्या –
- मुंबई (गिरणी कामगार) - 5090
- पुणे – 2000
- नाशिक – 92
- औरंगाबाद – 148
- कोकण (पंतप्रधान आवास योजने अंतर्गत) – 5300
- नागपूर – 898
- अमरावती – 1200
मे आणि जून या महिन्यात ‘म्हाडा’कडून अनेक घरांसाठी तसेच दुकान गळ्यांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यात म्हाडाच्या घरांवरचे सेवा शुल्क कमी करण्यात आल्याने ही घरे अजून स्वस्त होण्याची शक्यता आहे. लॉटरीसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला https://lottery.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर प्राप्त होईल. (हेही वाचा: म्हाडा लॉटरीमधील 13 हजार विजेते अद्याप गृहप्रतीक्षेत)
दरम्यान, लवकरच म्हाडाच्या पुढच्या लॉटरीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होईल. म्हाडाने आता एकाच अनामत रकमेवर अनेक घरांसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. अर्ज भरण्यासंदर्भात सर्व माहिती तुम्ही https://www.mhada.gov.in/en या संकेतस्थळावर मिळवू शकता. अर्ज करण्यासाठीची अनामत रक्कम ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस आणि एनईएफटी याद्वारे भरता येणार आहे.