HSC Maths Paper Leaked: बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला; सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो
बारावीचा पेपर फुटल्याने पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
HSC Maths Paper Leaked: सध्या बारावी बोर्डाचे पेपर सुरू आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा पेपर लीक झाल्याची बातमी समोर येत आहे. आज होणाऱ्या परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाण्याच्या सिंदखेडराजा येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल (HSC Maths Paper Leaked) होत आहे.
परीक्षेपूर्वी पेपरचा फोटो व्हायरल झाल्याने एकचं खळबळ उडाली आहे. बारावीचा पेपर फुटल्याने पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हा गणिताचा पेपर कोणी फोडला...? पेपर व्हायरल करण्यामागे कोण? यामागे काही सक्रिय रॅकेट आहे का...? त्याची पडताळणी केली जात आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या इंग्रजीच्या पेपरनंतर आता गणिताच्या पेपरमध्ये नवा गोंधळ निर्माण झाला आहे. पेपरफुटीला अद्याप बोर्डाच्या सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नाही. (हेही वाचा -Engineering Education in Marathi: 'इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीमधून दिल्यास अशा मुलांना पुढे कोणीही रोजगार देणार नाही'- Ajit Pawar)
दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असताना, शिक्षकच या मोहिमेला अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील परभणीत बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटल्याची घटना समोर आली होती.
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाल्यानंतर हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचंही समोर आलं होतं. हिंदी विषयाच्या पेपरमध्ये दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचा देण्यात आला होता. या गोंधळातच गणिताचा पेपर फुटल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.