IPL Auction 2025 Live

12 Years of 2011 Mumbai Bombings: बारा वर्षांपूर्वी तीन बॉम्ब स्फोटांनी हादरली होती मुंबई; अनेक कुटंबे झाली उध्वस्त, अजूनही ताज्या आहेत जखमा

गृह मंत्रालयाने याचे दहशतवादी कृत्य म्हणून वर्गीकृत केले. तपासात स्फोटांमध्ये अनेक आयईडी स्फोटकांचा वापर झाल्याचं निदर्शनास आले.

12 Years of 2011 Mumbai Bombings (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासात 13 जुलैचा दिवस एका दुःखद घटनेने नोंदवला गेला आहे. स्वप्ननगरी, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई 13 जुलै 2011 रोजी तीन बॉम्बस्फोटाने (The 2011 Mumbai Bombings) हादरली होती. मुंबईमध्ये 2011 साली 13 जुलै रोजी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर अशा गजबजलेल्या भागात तीन बॉम्बस्फोट झाले होते. या अपघातात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 130 हून अधिक जण जखमी झाले होते. इंडियन मुजाहिद्दीनने सह-संस्थापक यासीन भटकळच्या वैयक्तिक सहभागाने हा हल्ला केल्याचे मानले जाते.

दक्षिण मुंबईच्या झवेरी बाजारातील खाऊ गली येथे मोटरसायकलवर पहिला बॉम्ब लावण्यात आला होता. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.54 वाजता हा स्फोट झाला. चर्नी रोडवरील ऑपेरा हाऊस परिसरात प्रसाद चेंबर्स आणि पंचरत्न बिल्डिंगच्या बाहेर टिफिन बॉक्समध्ये दुसरा बॉम्ब लावला होता. हिरे-व्यापार उद्योगाशी संबंधित साधारण 5,000-6,000 लोकांच्या कामाच्या ठिकाणी 6.55 वाजता स्फोट झाला. दादर परिसरातील कबुतर खानाजवळील डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूल बेस्ट बसस्थानकात विजेच्या खांबावर तिसरा बॉम्ब लावला होता, जिथे 7.06 वाजता तिसरा स्फोट झाला.

एकापाठोपाठ एक झालेल्या तीन बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण मुंबई दहशतीच्या वातावरणाखाली होती. गृह मंत्रालयाने याचे दहशतवादी कृत्य म्हणून वर्गीकृत केले. तपासात स्फोटांमध्ये अनेक आयईडी स्फोटकांचा वापर झाल्याचं निदर्शनास आले. (हेही वाचा: Favorite Cities in the World; जगातील सर्वात आवडत्या शहरांच्या यादीत उदयपुरला दुसरे, तर मुंबईला दहावे स्थान)

पुढे 25 मे 2012 रोजी महाराष्ट्र एटीएसने नकी अहमद, नदीम शेख, कंवर पाथरीजा आणि हारून नाईक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले,  ज्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसला इंडियन मुजाहिदीनचा मास्टरमाइंड यासीन भटकळच्या ताब्यात देण्यात आले. तसेच 16 जुलै रोजी अब्दुल मतीन फक्की यालाही अटक केली गेली. फक्की याच्यावर यासीन भटकळला हवालाच्या माध्यमातून पैसे देऊन दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याचा आरोप होता.