11th Admission Process Dates: दहावीच्या निकालापूर्वी 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी तारखा जाहीर; 24 मे पासून भरता येणार भाग 1!
महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
MSBSHSE कडून आज बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावी च्या निकालाची उत्सुकता लागली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 10 च्या निकालाची अपेक्षा आहे. मात्र त्या आधी आता 11 वी प्रवेश प्रकियेची माहिती जारी करण्यात आली आहे. 24 मे पासून 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीला सुरूवात होत आहे. 22 मे दिवशी अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सराव करता यावा म्हणून दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. https://11thadmission.org.in/ या पोर्टलवर डमी लॉगिन आणि यासाठीच्या सुविधा दिल्या जातील.
अकरावी प्रवेशासाठी पहिला भाग भरण्याची प्रक्रिया 24 मे पासून सुरू होणार आहे तर दुसरा भाग दहावी च्या निकालानंतर भरण्यासाठी खुला केला जाईल.
अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी असणार?
- यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये FCFS ही फेरी होणार नाही. यामध्ये प्रथम येणार्यास प्राधान्य असा नियम होता पण आता तो बंद करण्यात आला आहे.
- अकरावीत प्रवेशासाठी यंदा तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या होणार आहेत.
- त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील.
- प्रत्येक फेरीसोबत विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू ठेवली जाणार आहे.
- व्यवस्थापन, अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोट्यातील प्रवेश महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहेत. कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास त्या केंद्रीय प्रवेशात समाविष्ट केल्या जातील. कोट्यातील प्रवेशही गुणवत्तेनुसार देण्यात येतील.
अर्ज भाग 1 कसा भरायचा?
- 11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता 11वी प्रवेशासाठी अर्जाचा भाग 1 भरा.
- ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करा.
- अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडा..
- मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी आपला अर्ज प्रमाणित करून घेऊ शकतात.
महाराष्ट्रात CISCE, CBSE बोर्ड सोबतच राज्य शिक्षण मंडळाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.