येत्या 3 महिन्यात मुंबई-अलिबाग रो-रो सेवा सुरु होणार

मुंबई-अलिबाग हा 3-4 तासांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनाने खास पाऊलं उचलली आहेत.

So-Bo to Alibaug Ro-Ro Service (Photo Credits: Wikimedia Commons)

विकेंड प्लॅन्ससाठी मुंबईकर अलिबागला खास पसंती देतात. मुंबई-अलिबाग हा 3-4 तासांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनाने खास पाऊलं उचलली आहेत. आता लवकरच मुंबई-अलिबाग (Mumbai-Alibaug) दरम्यान 'रोल ऑन रोल ऑफ शिप' (Roll on Roll off Ship) सुरु होणार आहे. यास 'रो-रो' (Ro-Ro) असेही म्हणतात. रो-रो सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांसोबत वाहनांची वाहतूक करणे देखील शक्य होणार आहे. यामधून तुम्ही कार्स, प्रायव्हेट बसेस मुंबई ते अलिबागपर्यंत नेऊ शकता. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला ही सेवा सुरु करण्यात येईल. तसंच या सेवेमुळे वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. (मुंबईकरांसाठी लवकरच उबर घेऊन येणार UberBOAT सेवा, स्पीडबोटने अवघ्या काही मिनिटात गाठू शकणार मांडवा, अलिबाग, एलिफंटा)

10 बसेस, 40 कार्स आणि 250 प्रवासी वाहून नेण्याची या रो-रो ची क्षमता असेल. तसंच यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळही वाचेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रो-रो सेवेचे दर कारसाठी सुमारे 300-400 रुपये, बससाठी 700-800 रुपये आणि प्रती प्रवासी 200-300 रुपये इतके असतील.

कालांतराने रो-रो सेवा विस्तारणार

रो-रो सेवेचा फायदा मांडवा, अलिबाग, मुरुड-जंजिंरा, वेलास, श्रीवर्धन या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल. सध्या ही सेवा मुंबई पोर्ट ट्रस्ट (MbPt) ते मांडवा/ दिघीपर्यंत सुरु करण्यात येईल. कालांतरानने या सेवेला विस्तारीत रुप देण्यात येईल. त्यानंतर ही सेवा नेरुळ आणि नवी मुंबईचे पनवेल-बेलापूर दरम्यान होणारे विमानतळापर्यंत वाढवण्यात येईल.