Mahabaleshwar Tourism Festival 2025: येत्या 2 ते 4 मे दरम्यान 'महाबळेश्वर पर्यटन महोत्सवा'चे आयोजन; हेलिकॉप्टर राइड, पॅराग्लायडिंग, तरंगते बाजार, साहसी खेळ, फूड स्टॉल्ससह अनेक कार्यक्रमांचे आयोजन
हा महोत्सव महाराष्ट्रातील पहिल्या मोठ्या पर्यटन उत्सवांपैकी एक आहे, ज्यामुळे महाबळेश्वरला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्याचा प्रयत्न आहे. उत्सवात सांस्कृतिक, साहसी आणि खाद्यप्रधान कार्यक्रमांचा समावेश आहे, जे प्रत्येक वयोगटातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल.
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर (Mahabaleshwar) हे केवळ हिल स्टेशनच नाही, तर निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. आता राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने 2 ते 4 मे दरम्यान 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025’ (Mahabaleshwar Tourism Festival 2025) आयोजित केला आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांसह साजरा होणाऱ्या या पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. 2 मे रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे या महोत्सवात येणाऱ्या पर्यटकांना तीन दिवस टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाबळेश्वरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
अहवालानुसार, 3 मे रोजी महाबळेश्वरमधील सबणे रोड येथे एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. या दिवशी पर्यटकांना राज्यातील प्रत्येक भागातील पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. 4 मे रोजी महोत्सवाच्या समारोप समारंभाच्या आधी लावणी, गोंधळ, जागर, नाशिक ढोल इत्यादी लोककला सादर केल्या जातील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोत्सवाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवामधील कार्यक्रमांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल-
विल्सन पॉइंटवर सकाळी लवकर योगासने, बासरी आणि सतार वादन, शहरातील संध्याकाळी होणाऱ्या कार्निव्हल परेडमध्ये आपल्या संस्कृतीचे पाश्चात्य संस्कृतीशी मिश्रण पाहण्याची संधी. वेण्णा तलावावर पाण्यावर तरंगता बाजार भरवला जाईल. संध्याकाळी भव्य लेसर आणि ड्रोन शो आयोजित केले जातील. शहरातील बाजारपेठेव्यतिरिक्त, काही ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम देखील सादर केले जातील. तापोळा येथे जलक्रीडा, तर भोसे येथे पर्यटकांना साहसी खेळ खेळण्याची संधी मिळेल. साहसी खेळांमध्ये पॅराग्लायडिंग आणि हेलिकॉप्टर राइडचा समावेश आहे. मखरिया हायस्कूलमध्ये फूड फेस्टिव्हल अंतर्गत फूड स्टॉल्स लावले जातील. (हेही वाचा: How To Book Nature Trail In Malabar Hill: मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी ऑनलाईन बूकिंग कसं कराल?)
महाबळेश्वरच्या स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गटांना विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या हस्तकलेसाठी स्टॉल्स उभारले जातील, जिथे पर्यटक स्थानिक हातमाग, दागिने आणि इतर वस्तू खरेदी करू शकतील. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यास मदत होईल. या उत्सवात हजारो पर्यटक येण्याची अपेक्षा आहे, आणि त्यांच्यासाठी सर्वोत्तम सुविधा देण्याचे नियोजन आहे. सातारा, वाई आणि कोकणातून येणाऱ्या रस्त्यांचे दुरुस्तीचे काम आधीच पूर्ण केले जाईल, आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांचेही सुशोभीकरण होईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पोलीस व्यवस्था असेल, आणि अडकलेली वाहने हटवण्यासाठी क्रेन तैनात केल्या जातील. पोलीस मैदानावर मोफत पार्किंगची व्यवस्था केली जाईल आणि सर्वोत्तम योगदान देणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)