भारतामधील पहिली 3 डी आर्ट गॅलरी
संपूर्ण जगात अवघ्या १२ देशांमध्ये फक्त ४२ अशा प्रकारच्या आर्ट गॅलऱ्या आहेत, पैकी भारतामध्ये २०१६साली अशा प्रकारची गॅलरी सुरु झाली.
कला ही सर्वात आकर्षक अनुभूतींपैकी एक आहे. मात्र जोपर्यंत या कलेतून परस्पर संवाद निर्माण होत नाही तोपर्यंत ही कला अपूर्णच समजावी. याच मुद्द्याला लक्षस्थानी ठेऊन कलेतून संवाद साधण्याचा फार हटके प्रयत्न चेन्नईस्थित कलाकार ए.पी.श्रीधर यांनी केला आहे. श्रीधर यांनी चेन्नईमध्ये भारतामधील पहिली 3 डी आर्ट गॅलरी सुरु केली आहे.
संपूर्ण जगात अवघ्या १२ देशांमध्ये फक्त ४२ अशा प्रकारच्या आर्ट गॅलऱ्या आहेत, पैकी भारतामध्ये २०१६साली अशा प्रकारची गॅलरी सुरु झाली. हाँगकाँग, मलेशिया आणि सिंगापूर इथे पाहिलेल्या अशा प्रकारच्या संग्रहालयावरून श्रीधर यांना ही कल्पना सुचली. याबाबत ते सांगतात, “याआधी अशाप्रकारे भिंतीवरील चित्र बाहेर येऊन लोकांचा भाग बनताना कधी पहिले नव्हते. त्यामुळे मला ही कल्पना फारच भावली”. ही सर्व चित्रे तयार होण्यास जवळजवळ 3 वर्षांपेक्षा जास्त काल लागला.
या संग्रहालयामध्ये एकूण २४ 3 डी कलेचे नमुने ठेवले आहेत. मुख्यतः यामध्ये पेंटिंग्जचा समावेश आहेत. पाहणाऱ्या व्यक्तीला आखून दिलेल्या मार्कवर उभे राहायचे आहे, जेणेकरून ती व्यक्ती त्या चित्राचा भाग होईल.
इथे तुम्हाला मोनालिसा, मंकी ते व्हीनस अशा अनेक प्रसिद्ध गोष्टींची चित्रे पाहायला मिळतात
या पेंटिंग्ज 2डी सुद्धा बनवल्या जातात, पण त्यानंतर त्यांना ३डी मध्ये रुपांतरित केले जाते. 3डी मध्ये रुपांतरित करताना पेंटिंगवर पडणाऱ्या लाइटवर आणि सावलीवर खास लक्ष दिलं जातं. जेणेकरुन त्याचा पूर्ण 3डी इफेक्ट दिसेल.
भारतातील या पहिल्या ३डी म्युझिअममध्ये आतापर्यंत ४० लाखांपेक्षा जास्त फोटो काढण्यात आले आहेत. रोज इथे शेकडो पर्यटक भेट देतात. चेन्नईसोबतच हे म्युझिअम आता दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुमध्येही सुरु झालं आहे.
पत्ता - व्हीजीपी स्नो किंगडम, 159, 5/108, ईस्ट कोस्ट रोड, अक्काराई, इंजंबक्कम
फी – १५०रु प्रौढांसाठी, १००रु लहान मुलांसाठी
वेळ – स. १० ते ८