भारतीय रेल्वे ने आणला नवा AC 3 Tier Economy Class Coach; पहा जगातला सर्वात स्वस्त, आरामदायी कोच आहे कसा?
रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा नवा कोच सध्याच्या एसी थ्री टीअर आणि नॉन एसी स्लीपर क्लास च्या मधील किंमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
भारतीय रेल्वेने आज पहिला वातानुकुलित 3 Tier Economy Class Coach आणला आहे. रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा नवा कोच सध्याच्या एसी थ्री टीअर आणि नॉन एसी स्लीपर क्लास च्या मधील किंमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरम्यान रेल्वेच्या या नव्या कोचमुळे अधिकाधिक प्रवाशांना किफायतशीर दरात आरामदायी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या या डब्ब्यांमध्ये नेमक्या कोणत्या सोयी सुविधा असतील? हा नवा कोच दिसतो कसा हे प्रश्न तुमच्या मनात असतील तर खालील माहिती नक्की वाचा. (हे देखील वाचा: Indian Railways प्रवाशांचा हलका करणार भार! आता घरापासून ते तुमच्या आरक्षित रेल्वे आसानापर्यंत पोहोचवणार प्रवाशांचे सामान, जाणून घ्या सविस्तर.)
जाणून घ्या नव्या थ्री टीअर इकॉनॉमी क्लास बद्दल सारे काही
- रेल कोच फॅक्टरी मध्ये या नव्या कोचचं डिझाईन ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झालं. नंतर आता अशाप्रकारे सध्याच्या आर्थिक वर्षात सुमारे 248 कोच बनवण्याच काम सुरू झालं आहे.
- बर्थच्या डिझाईन मध्ये बदल करण्यात आले आहेत. फोल्डेबल टेबल आता यामध्ये असतील. वॉटर बॉटल, मोबाईल फोन आणि मासिकं ठेवण्यासाठी खास होल्डर्स असतील. सीट आणि बर्थ मध्येही पुरेशी जागा असेल.
- एका सॉकेटसोबतच आता प्रत्येक बर्थ साठी त्यांचा वैयक्तिक रिडींग लाईड असेल. मोबाईल चार्जिंग पॉईंट असेल.
- पूर्वी 72 बर्थची क्षमता असणारा नवा कोच आता 83 बर्थ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
- प्रत्येक कोच मध्ये आता शौचालयात जाण्यासाठी तुलनेत पूर्वीपेक्षा मोठा दरवाजा असेल. दिव्यांगांसाठी त्यांच्या सोयीनुसार टॉयलेट एंट्री असेल.
- मिडल आणि अप्पर बर्थ मध्ये जाण्यासाठी आता खास नव्या डिझाईनच्या पायर्या असतील. तसेच मिडल आणि अप्पर बर्थ मध्ये हेड रूम म्हणजेच मोकळी जागा देखील अधिक असेल.
रेल्वेच्या दाव्यानुसार त्यांचे हे नवे थ्री टिअर इकॉनॉमी कोच हे जगातील सर्वात स्वस्त आणि सुलभ प्रवासासाठीचे कोच आहेत. वर्षभरापूर्वी लॉकडाऊन मध्ये बंद केलेली रेल्वे सेवा आता हळूहळू पुन्हा सुरू केली जात आहे. सध्या सार्याच मार्गांवर मर्यादीत स्वरूपात ट्रेनच्या फेर्या चालवल्या जात आहेत. यामध्येही नागरिकांना सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.