Christmas, New Year च्या विकेंडदरम्यान खाजगी बसभाड्यात 30-50 % वाढ !
2 जानेवारीपर्यंत ही खाजगी बसची भाडेवाढ राहण्याची शक्यता आहे.
यंदा ख्रिसमस (Christmas) आणि न्यू ईयर (New Year) हे वीकेंडलाच जोडून आलं आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी मुंबई, पुणे, कोकण , गोवा या भागात फिरण्याचे प्लॅन बनवले असतील. पण आयत्या वेळेस अशी शॉर्ट ट्रीप प्लॅन करणाऱ्यांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. कारण खाजगी बस वाहतूकदारांनी यंदाही भाडेवाढ केली आहे. खासगी बस वाहतुकदारांनी भाडेदरात 30 ते 50 टक्के वाढ केल्याने अनेक प्रवासी हिरमुसले आहेत.
सध्या काय आहेत खाजगी बसचे दर?
मुंबई ते गोवा नॉन एसी बसचं तिकीट सामान्य दिवसात 600 रुपये असेल तर सध्या तुम्हांला 1200 रुपयांपर्यंत मोजावे लागू शकतात.
एसी स्लीपरचे दर 800 ते एक हजार रुपयांपर्यंत सामान्य दिवसांमध्ये असतील तर सध्या भाडे 2500 रुपयांपर्यंत मोजावे लागतील.
मुंबई ते महाबळेश्वर हा प्रवासातही 200 ते 400 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
खाजगी बसप्रमाणेच रेल्वेचं बुकिंग देखील हाऊसफुल्ल आहेत. रेल्वेचं बुकिंग सुमारे 3-4महिने आधीच बुक करावं लागत असल्याने अनेकांना या दि वासातलं रेल्वेचं तिकीट हे प्रतीक्षा यादीमध्येच आहे. रेल्वेने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ख्रिसमस स्पेशल काही ट्रेन्स सोडल्या आहेत. 2 जानेवारीपर्यंत ही खाजगी बसची भाडेदर वाढ राहण्याची शक्यता आहे.