Tips For Parents: अतिजड शालेय दप्तर तुमच्या लहाग्याच्या आरोग्यावर पडू शकते भारी, पालकांनो अशी घ्या काळजी
शालेय जीवनातल्या आठवणींचा महत्वाचा भाग म्हणजे शाळेचं दप्तर (School Bag), पूर्वी घरातली एखादी पिशवी, त्यात एखादी पाटी, पेन्सिल, असलीच तर पट्टी, एखादी वही यालाच दप्तर म्हणायची पद्धत होती,या दप्तरात वह्या पुस्तकांपेक्षाही चोरून आणलेल्या चिंचा, गोळ्या चॉकलेट यांचंच राज्य अधिक असायचं, मात्र अलीकडची परिस्थिती पाहता हे चिमुकले शाळकरी विद्यार्थी आहेत की पाठीवर पोतं उचलून नेणारे हमाल हेच समजत नाही. वास्तविकता शाळेत नेण्याच्या वस्तूंचे प्रमाण इतके वाढलेय की त्यात पालक किंवा मुलांची काही चूक नाही पण याकडे लक्ष न दिल्यास तुमच्या लहानग्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आई-वडिल होणं सोपं नाही, कसा अनुभवाल तो नऊ महिन्यांचा अद्भूत प्रवास? वाचा हा विशेष लेख
अलीकडेच, International Journal of Environmental Research and Public Health मध्ये सुद्धा अतिजड दप्तराने लहान मुलांच्या पाठीवर आणि परिणामी स्वास्थ्यावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी सांगण्यात आले आहे.
चला तर मग आधी पाहुयात जड दप्तरामुळे नेमकं घडत काय?
-शरीराची ठेवण बिघडते
शाळेत येण्याजाण्याचा वेळ धरल्यास साधारण 15 ते 20 मिनिटे रोज तुमची मुले जड दप्तर पाठीवर उचलतात, सुरवातीला हा जरी शुल्लक वेळ वाटत असला तरी आठवड्याचा किंबहुना महिन्याचा विचार केल्यास तुम्हाला या वजनाच्या प्रभावाचा अंदाज येऊ शकतो. इतक्या वेळासाठी बॅग पाठीवर लावल्याने मुलांचे शरीर संतुलन राखण्यासाठी पुढील बाजूला झुकते याची सवय लागून पुढे शरीराची ठेवणेच तशी होते. यामुळेच अनेकदा पोक काढून चालणे, झुकलेल्या- वाकलेल्या स्थितीत चालण्याच्या सवयी लागतात.
-स्नायूंवर दबाव
जड दप्तर उचलल्याने साहजिकच शरीरातील स्नायूंवर जोर पडू शकतो. ज्यामुळे पाठीच्या मणक्याचे दुखणे, सांधेदुखी, खांद्यावर ताण अशा समस्या उद्भवतात. याशिवाय मणके, स्नायूंची झीज, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे दुष्परिणाम होतात.
पण चिंता करू नका, प्रत्येक समस्येप्रमाणे यावर सुद्धा उपाय आहेत, थोडी शक्कल लढवून शाळेच्या दप्तरात केलेल्या छोट्या मोठ्या बदलांमुळे मुलांच्या पाठीवरचा भार कसा कमी करायचा जाणून घ्या...
-मुलं शाळेची बॅग भरताना काही दिवस लक्ष द्या, त्यातल्या अनावश्यक गोष्टी तुम्हालाच जाणऊन येतील, अनेकदा वारंवार बॅग भरायला लागू नये म्हणून मुलं स्वतःच आपल्याकडील सर्व वह्या पुस्तके सोबत घेऊन जातात, असे करण्यापासून मुलांना थांबवा.
- शाळेत द्यायच्या वह्यांचा आकार सुद्धा वजनाचा एक भाग असतो. 200-300 पानी वह्यांपेक्षा 100 पानी वह्या शाळेत द्या, एक वही संपली की दुसरी वापरता येईल मात्र त्यामुळे दप्तराचं भार नक्कीच कमी होऊ शकतो.
-शाळेतील अभ्यास लिहायला एक वेगळी वही व गृहपाठाला वेगळी वही केल्यास बराच फरक जाणवेल.
-बॅग अडकवण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या, बॅगेचे बेल्ट हे एकमेकांना समांतर असतील असे ठेवा, एक बेल्ट घट्ट आणि एक सैल असल्यास पाठीवर वजन संतुलित राहत नाही.
-बॅग पाठीला घट्ट असेल याकडे लक्ष द्या, सैल पट्ट्यांमुळे मुलांना मागील बाजूस झुकून चालावे लागते.
-बॅग खरेदी करताना काळजीपूर्वक तपासून घ्या, रिकाम्या दप्तराचे वजन पडताळून घ्या. फॅन्सी बॅग घेण्यापेक्षा, थोडे जाड पट्टे असलेली बॅग निवडा, पट्ट्यांचे कापड पॅडेड असेल तर उत्तम.
अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता, पाठीला बॅग अडकवलेल्या, शाळेच्या गणवेशातील तुमच्या लहानग्याला बघून तुम्हाला आनंद होत असणार हे निश्चितच पण त्यासाठी त्याचे आरोग्य बिघडत नाही हे पाहणे देखील आवश्यक आहे, बरोबर ना?
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. )