Maha Shivratri 2019: शिवाच्या कोपापासून वाचण्यासाठी महाशिवरात्रीला चुकुनही करू नका या गोष्टी

तसेच या दिवशी धनिष्ठा नक्षत्राचा योग असल्याने शिवरात्रीला खास मानले जात आहे. मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियम कटाक्षाने पाळले जातात

महादेव (Photo Credit : File Image)

4 मार्च, सोमवारी देशभरात महाशिवरात्रीचा (Maha Shivaratri) दिवस साजरा केला जाईल. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. शंकराची निद्रावस्था, शिवाचे तांडवनृत्य, शंकर-पार्वती विवाह अशा अनेक आख्यायिका या दिवसाशी निगडीत आहेत. भगवान शंकराची पूजा-अर्चा, प्रार्थना, शिवाचा जयजयकार करण्याचा हा दिवस. या दिवशीच्या उपवसाचेही विशेष महत्व आहे, महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. जो भक्त शंकराची मनोभावे पूजा करून हा उपवास करेल, रात्रीच्या चार प्रहरी शिवाची यथासांग पूजा करेल त्याच्यावर महादेवाची सदैव कृपा राहील असे सांगितले जाते.या वर्षी सोमवारी महाशिवरात्रीचा योग आला आहे. तसेच या दिवशी धनिष्ठा नक्षत्राचा योग असल्याने शिवरात्रीला खास मानले जात आहे. मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियम कटाक्षाने पाळले जातात. काही गोष्टी करण्याचे टाळले जाते शिवाच्या कोपापासून वाचण्यासाठी या नियमांचे जरूर पालन करा.

> या दिवशी अंघोळ केल्याशिवाय काही खाऊ नये. उपवास करावा, उपवास शक्य नसल्यास गहू भात आणि डाळीपासून तयार पदार्थ खाऊ नये.

> या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका.

> महादेवाला पांढरी फुले वाहिली जातात, मात्र पांढरी केतकी आणि केवडा महादेवाला वाहिली जात नाही. तसेच शिवाला तुळशीपत्रही वाहिले जात नाही.

> महादेवाच्या पिंडीवर हळद अर्पण केली जात नाही, शास्त्रांप्रमाणे शिवलिंग पुरुषत्वाचे प्रतीक आहे म्हणून वर्षातून केवळ एकदा म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी महादेवाला हळद अर्पण करण्याची परंपरा आहे.

> पृथ्वीवर महादेव योग मुद्रेत राहतात म्हणून पिंडीवर किंवा महादेवाच्या प्रतिमेवरदेखील कुंकू चढवत नाही.

> नारळ पाण्याने महादेवाला अभिषेक करू नये. नारळ लक्ष्मीस्वरूप मानले गेले आहे.

> शिवलिंगावर अर्पण केलेल्या प्रसादाचे भक्षण करू नये. (हेही वाचा:  जाणून घ्या ‘महाशिवरात्री’चे महत्व, पूजा विधी, मंत्र आणि कसा करावा उपवास)

> पूजेला तुटलेला किंवा अर्धवट तांदूळ वापरू नये. तसेच बेलपत्राचे एकही पान तुटलेले नसावे, वाहताना बेलपत्राचे तोंड आपल्याकडे असावे.

> महादेवाच्या पिंडीची पूजा करणे आणि पिंडीला स्पर्श करणे कुमारिकेसाठी निषेध आहे. अविवाहित स्त्रीने शिवलिंगाची प्रदक्षिणादेखील घालू नये. मात्र देवी पार्वतीसह कुमारिका महादेवाची पूजा करू शकतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी नदीवर स्नान करून शिवलिंगवर रुद्राभिषेक करून विधीवत पूजा केली जाते. आसनावर बसून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करावी. महाशिवरात्रीला शिव आराधना करताना अभिषेक करण्याचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व महामृत्युंजय मंत्राचे देखील आहे.