चॉकलेटप्रेमींसाठी खास Chocolate Dim Sum रेसिपी
चॉकलेटाचा एक हटके प्रकार आपल्याला घरच्या घरी बनवा आला तर....?
आजकाल खास क्षणांचे सेलिब्रेशन चॉकलेटने होते. बर्थडे पार्टी, रक्षाबंधन किंवा प्रेमाचे गिफ्ट असो चॉकलेटचा पर्याय हमखास निवडला जातो. चॉकलेटही अगदी आबालवृद्धांपासून सर्वांनाच आवडते. मग चॉकलेटाचा एक हटके प्रकार आपल्याला घरच्या घरी बनवा आला तर....? म्हणूनच खास चॉकलेटप्रेमींसाठी चॉकलेट स्टीम्ड डिमसमची रेसिपी...
साहित्य
२ कप बटाटा स्टार्च
१ कप गहू स्टार्च
अर्धा कप साबुदाणा स्टार्च
४ चमचे चॉकलेट सॉस
दीड कप कोमट पाणी
स्टफिंगसाठी साहित्य
दीडशे ग्रॅम डार्क चॉकलेट
५० ग्रॅम नूट्रेला (चॉकलेट हेजलनट पेस्ट)
५० ग्रॅम सुकामेवा
कृती
एका भांड्यात वरील सर्व प्रकारचे स्टार्च आणि चॉकलेट सॉस मिसळा. त्यात थोडे थोडे पाणी घाला आणि मऊसुद मिश्रण तयार करा. हे मिश्रण तासभर झाकून ठेवा.
त्यानंतर डार्क चॉकलेट, हेजलनट पेस्ट आणि सुकामेवा एकत्र करून स्टफिंग तयार करा. मिश्रण तयार झाल्यानंतर झाकून ठेवलेले मिश्रण पुन्हा एकदा मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोल बनवा. ते मैद्यात घोळवा आणि गोलाकार लाटा. त्यात एक चमचा स्टफिंग घाला आणि लाटी दुमडून बंद करा.
मग स्टिमर पॅनमध्ये १-२ ग्लास पाणी घालून उकळवा आणि १० मिनिटांसाठी वाफेवर शिजवा. याचा आकार फुगून डबल होईल.
डिमसिम तयार झाल्यानंतर ते व्हीप्ड क्रिम सोबत तुम्ही खावू शकता.
रेसिपी - शेफ कमलेश रावत, एक्झिक्युटिव्ह शेफ, रेडिसन मुंबई गोरेगांव