Husband Wife Relationship: इंजिनीअर नवरा मजूर झाला, पोटगी टाळण्यासाठी शक्कल; कोर्टाने दिला दणका

त्यामुळे त्याला पोटगीपोटी येणारी रक्कम द्यायला कोणताही अडथळा येणार नाही, असे सांगत कोर्टाने पतीचा दावा फेटाळून लावला. तसेच पत्नीला देखभालीसाठी प्रतिमहिना 12 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले.

Husband-Wife Divorce | Edited Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Husband And Wife News: पत्नीपासून घटस्फोट घेताना पोटगी (Alimony) द्यावी लागू नये, यासाठी अभियांत्रिकीची पदवी असणाऱ्या एका नवरोबाने भलतीच शक्कल लढवली. पण कोर्टाने केलेल्या बारीक निरिक्षणात ही शक्कल पकडली गेली आणि नवरोबाचे बिंग उघडे पडले. आपण बांधकाम मजूर असल्याने पोटगीची रक्कम देऊ शकत नसल्याचा दावा पतीने कोर्टात केला होता. मात्र, अभियांत्रिकीची पदवी असलेला तरुण नोकरी अथवा स्वत:चा व्यवसाय करु शकतो. त्यामुळे त्याला पोटगीपोटी येणारी रक्कम द्यायला कोणताही अडथळा येणार नाही, असे सांगत कोर्टाने पतीचा दावा फेटाळून लावला. तसेच पत्नीला देखभालीसाठी प्रतिमहिना 12 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले.

कौटुंबीक न्यायालयात एका पत्नीने पतीविरोधात पोटगीचा दावा दाखल केला होता. न्यायाधीश बी. डी. कदम यांच्या खंडपीठापुढे हा खटला चालला. खटल्यातील जोडप्याचा विवाह 2018 मध्ये झाला होता. या विवाहातून या दाम्पत्यास एक मुलगी झाली. मात्र, अपत्यप्राप्तीनंतर सासरच्या कुटुंबाकडून महिलेचा छळ सुरु झाला. त्यातच पती आणि तिच्या कुटुंबीयांनी मारहाण करुन तिला घराबाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा याचिकारर्ता (पत्नी) महिला दुसऱ्यांदा गरोदर होती. दरम्यान, तिचे बाळंतपणही झाले. मात्र, पती किंवा त्यांचे कुटुंबीय बाळाला पाहण्यासाठी एकदाही आले नाहीत. तसेच, सारच्या मंडळींनी आपणासोब तुच्छतेचे वागणेही कायम ठवले. या पार्श्वभूमीवर पत्नीने कोर्टा याचिका दाखल केली होती.

पतीने कर्टात दावा केला की, याचिकाकर्ता (पत्नी) कमावती आहे. तिला मासिक 20 ते 25 हजार रुपये पगार आहे. त्याउलट आपणास कोणताही कामधंदा नाही. आपण बांधकाम मजूर म्हणून काम करत असून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी पती हा अभियांता आहे. आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर तो चांगली नोकरी, व्यवसाय करु शकतो, असे कर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

याचिकाकर्त्यांच्या वकीलाचा दाव विचारात घेऊन कोर्टाने पती हा नोकरी किंवा कामधंदा करुन वीस ते पंचवीस हजार रुपये पगार मिळवू शकतो. त्यापैकी पत्नी आणि दोन मुले असे मिळून प्रत्येकी चार हजार रुपये पोटगी रक्कम म्हणून देणे त्याला सहज शक्य आहे, असे सांगत कोर्टाने पोटगी मंजूर केली आणि पतीचा दावाही फेटाळून लावला.

पोटगी म्हणजे एक पती/पत्नीने दुसर्‍याला आवश्यक असलेले पैसे देणे. हे पैसे म्हणजेच निश्चीत रक्कम कोर्टाकडून ठरवून दिली जाते. घटस्फोटामुळे कमी कमाई करणार्‍या जोडीदाराच्या राहणीमानात मोठी घसरण होणार नाही यासाठी मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. विशेषत: जर या जोडप्याचे लग्न दीर्घकाळ झाले असेल आणि दोन पती-पत्नींमध्ये कमाईच्या शक्तीमध्ये मोठी तफावत असेल तर पोटगी दिली जाते. पोटगी याला कधीकधी जोडीदार देखभाल खर्च म्हणूनही संबोधले जाते. बहुतांश वेळा पतीकडूनच पत्नीला पोटगी दिली जाते. मात्र, अलिकडील काही काळात महिलाही अधिक रक्कम कमावतात. परिणामी काही प्रकरणात पत्नीकडूनही पतीला पोटगी दिली जाते.