World Smile Day: स्माईल प्लीज! दररोज हसण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून
Smile Please | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जागतिक स्माईल डे (World Smile Day) दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो. या वर्षी, तो आज, 7 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. तो पहिल्यांदा 1999 मध्ये साजरा करण्यात आला. या वर्षीची थीम आहे "दयाळूपणाचे कार्य करा आणि एका व्यक्तीला हसण्यास मदत करा." (Do an act of kindness. Help one person smile). आजच्या या हास्यदिनानिमित्त आम्ही हसण्याचे काही आरोग्य फायदे ( Benefits of Smile) सांगत आहोत. जे कदाचित तुम्हाला माहित नसतील.

हसण्याचे फायदे

तणाव कमी होतो (Relieves Stress): हसण्यामुळे तणावाचा सामना करता योतो. अभ्यासक सांगतात तणावाशी लढण्यास मदत करण्यासाठी न्यूरोपेप्टाइड्स नावाचे लहान रेणू हसण्याने उत्सर्जीत होतात आणि बाहेर पडतात. जर तुम्हाला नियमितपणे चिंतेचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही रक्तप्रवाहात तणाव-प्रेरित हार्मोन्स कमी करण्यासाठी अधिक हसण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे. (हेही वाचा, World Smile Day : अरेच्चा ! हसण्याचे आहेत 'इतके' प्रकार ..)

दीर्घायू (Live Longer): हसण्याने आयुष्य वाढते. अनेक अभ्यासक सांगतात की, ज्यांच्या जीवनात हसण्याचे प्रमाण अधिक आहे त्यांना दिर्घायू लाभत असते.

मन:शांती वाढते (Elevates Mood): जेव्हा तुम्ही दु:खी असता तेव्हा मनाला आनंद देण्यासाठी हसत चला. हसण्याने मनस्थीती सुदृढ राहते. शिवाय मनशांतीही लाभते. ज्यामुळे विचारांची पातळी आणि मानसिक स्थितीही उंचावते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते (Boosts the Immune System) : हसल्याने संपूर्ण आरोग्याला चालना मिळते. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जेव्हा आपण आनंदी आणि हसत असतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रभावीपणे कार्य करते. कारण ती आपल्या मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर डोपामाइन सक्रिय करते ज्यामुळे अँटीबॉडीज आणि इतर आजार-मार करणाऱ्या पेशींचे उत्पादन वाढते.

रक्तदाब कमी होतो (Reduces Blood Pressure): हसल्याने सुरुवातीला हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास वाढवून आणि नंतर हळूहळू स्नायू शिथिल होतात. ज्यामुळे अखेरीस हृदयाचे ठोके योग्य राहतात आणि रक्तदाबही कमी होऊ शकतो.

मानवी जीवनात हसण्याचे अनेक फायदे आहेत. वरवर पाहता ते जाणवत नसले तरी असतात जरूर. त्यामुळे आपणही आपल्या आयुष्यात विनोद आणि हसण्याला अधिक प्राधान्य द्या. तुम्ही कोणत्याही दु:खात असला तरी हसण्याने तुमच्या दु:खाची तीव्रता अधिक वेगाने कमी होऊ शकते.