प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती
मात्र प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? याचा कोरोना व्हायरस विरुद्ध लढ्यात उपयोग होईल? यासाठी कोरोनातून रिकव्हर झालेल्या व्यक्तींच का रक्तदान करायचे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. तर सविस्तर जाणून घेऊया प्लाझ्मा थेरपी बद्दल...
कोरोना विषाणूबद्दल माहिती: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जगातील अनेक देश लॉकडाऊनच्या स्थितीत आहेत. मात्र हा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी झालेला उपाय. परंतु, या विषाणूची लागण झाल्यावर उपचार करण्यासाठी विशिष्ट औषध, लस उपलब्ध नाही. म्हणूनच त्यावर उपचार शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ, रिसर्च तज्ञ प्रयत्नशील आहेत. कोरोना रुग्णाला लागू पडतील अशा विविध उपारपद्धती शोधण्याचे काम सुरु आहे. अशातच एक दिलासादायक उपचारपद्धती निर्दशनास आली आहे. ती म्हणजे प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy). याला कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी (Convalescent Plasma Therapy) असेही म्हणतात. या उपचारपद्धतीत रक्तातील प्लाझ्मा आणि रोगप्रतिकारक रेणू (Immune Molecules) द्वारे कोरोना रुग्णावर उपचार केले जातात. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अॅन्टीबॉडीज (Antibodies) तयार होतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा काढून कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. यामुळे कोरोना व्हायरसचा शरीरात संसर्ग पसरण्याचा वेग मंदावू शकतो.
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अनेक देशांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग केला जात आहे. अमेरिका, चीन, स्पेन, तुर्की, साऊथ कोरिया, इटली, युके यांसह काही देशांमध्ये कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला गेला आहे. त्यानंतर आता भारतातही कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात येणार आहे. (कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांना Fight Against Coronavirus मध्ये सहभागी होण्याची संधी; रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी BMC कडून खास Email ची सोय)
Convalescent Plasma Therapy म्हणजे काय?
या उपचारपद्धतीत कोरोना संसर्गातून रिकव्हर झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील अॅन्टीबॉडीजचा वापर कोविड 19 च्या रुग्णांना बरे करण्यासाठी केला जातो. कोरोनामुळे गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांच्या शरीरात हे अॅन्टीबॉडीज इंजेक्ट केले जातात.
प्लाझ्मा थेरपीचा इतिहास:
1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लू, इबोला, सार्स या साथीच्या रोगांच्या दरम्यान प्लाझ्मा थेरपी एक यशस्वी उपचारपद्धती ठरली होती. गोवर, बॅक्टेरियल न्युमोनिया यावर देखील ही उपचारपद्धती उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे कोविड 19 या साथीच्या रोगावर देखील ही उपचार पद्धती उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
प्लाझ्मा थेरपीच्या काही स्टेप्स:
प्लाझ्मा थेरपीच्या काही महत्त्वपूर्ण स्टेप्स आहेत. 1- कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे रक्त घेणे. 2- रक्तातून convalescent serum वेगळे करणे. 3.- त्यात कोरोना विरुद्ध लढण्याचे अॅन्टीबॉडीज आहेत की नाही हे तपासणे. 4.- अॅन्टीबॉडीज असलेले serum कोरोना विरुद्ध उपचारासाठी वापरणे.
हे अॅन्टीबॉडीज कोरोनातून रिकव्हर झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार होतात आणि तेच आपण इतर रुग्णांसाठी वापरु शकतो.
Convalescent Serum म्हणजे काय?
कोरोना संसर्गातून रिकव्हर झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून Serum काढले जातात. याचा वापर कोरोना रुग्णांवर केला जातो. शरीर बॅक्टेरीया विरुद्ध लढण्यासाठी प्रोटीन्स तयार करते त्याला अॅन्टीबॉडीज असे म्हणतात आणि तेच अॅन्टीबॉडीज आजारावर मात करण्यास सक्षम ठरतात.
कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरेल?
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्लाझा थेरपी यशस्वी ठरेल याचे काही पुरावे देता येणार नाहीत. परंतु, यापूर्वी अशा प्रकारच्या साथीच्या रोगामध्ये याचा यशस्वी परिणाम पाहायला मिळाला होता. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरेल का? हे पाहण्यासाठी भारत, अमेरिका यांसारख्या अनेक देशात याचा वापर केला जात आहे. मात्र कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्लाझ्मा थेरपी सध्या प्रयोगशील टप्प्यात आहे.
प्लाझ्मा डोनेट कोण करु शकतं?
कोणीही प्लाझ्मा डोनेट करु शकत नाही. पूर्वी कोरोनाची लागण झालेल्या आणि त्यातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तीच केवळ प्लाझ्मा डोनेट करु शकतात. कारण त्यांच्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अॅन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात. मात्र हे केवळ हेल्थ एक्स्पर्टचं ठरवू शकतात. जर तुम्ही प्लाझ्मा थेरपीसाठी रक्त देण्यास पात्र असाल तर ती अगदी सोपी पद्धत आहे. एका लहानशा डिव्हाईसने तुमच्या रक्तातील प्लाझ्मा वेगळा करुन लाल रक्त पेशी पुन्हा तुमच्या शरीरात सोडल्या जातात.
काल (23 एप्रिल) AIIMS चे डिरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, "कोविड 19 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग देशातील विविध सेंटर्सवर सुरु करण्यात आला आहे. यासाठी कोरोनामुक्त झालेले अनेकजण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत."
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने महाराष्ट्र राज्याला देखील प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्याची परवानगी दिली आहे. ICMR च्या परवानगी नंतर मुंबईतील रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यापूर्वी केरळ राज्याला ही परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे कोरोना विरुद्ध प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग प्रयोग करणारं केरळ हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. सध्या देशात 23,077 कोरोना बाधित रुग्ण असून त्यातून रिकव्हर झालेल्यांची संख्या 4,749 आहे. तर कोविड 19 व्हायरसने भारतात 718 नागरिकांचा बळी घेतला आहे.