Voice Change Surgery Package: ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिलासा! बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरू झाले ट्रान्स पर्सन्ससाठी भारतातील पहिले अनुदानित व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया पॅकेज, जाणून घ्या शुल्क
या पॅकेजमध्ये आपत्कालीन काळजी वगळण्यात आली आहे, परंतु सामान्य वॉर्डमध्ये प्रवेश समाविष्ट आहे. हा उपक्रम अशा लोकांसाठी आहे ज्यांना विमा संरक्षण नाही आणि महागड्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत.
Voice Change Surgery Package: मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Bombay Hospital) ट्रान्सजेंडर व्यक्तींना (Transgender Persons) त्यांच्या लिंग ओळखीशी सुसंगत आवाज (Voice Change Surgery) मिळविण्यात मदत करण्यासाठी, नवीन अनुदानित पॅकेज डिझाइन करण्यात आले आहे. एखाद्या रुग्णालयामध्ये अशा शस्त्रक्रियेसाठी अनुदान देणारे बॉम्बे हॉस्पिटल हे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. या आठवड्यात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दोन ट्रान्समहिला- एक 30 वर्षीय ग्राफिक डिझायनर आणि दुसरी 25 वर्षीय मेकअप आर्टिस्ट यांच्यावर या अनुदानित पॅकेज अंतर्गत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमाचे नेतृत्व स्वरयंत्रतज्ज्ञ आणि व्हॉइस सर्जन डॉ. नुपूर नेरुरकर करत आहेत.
रुग्णालयामध्ये 20,000 रुपयांच्या कमी किमतीत आवाज बदलण्याची शस्त्रक्रिया प्रदान केली जात आहे. या पॅकेजमध्ये आपत्कालीन काळजी वगळण्यात आली आहे, परंतु सामान्य वॉर्डमध्ये प्रवेश समाविष्ट आहे. याबाबत वैद्यकीय सेवा संचालक डॉ. राजकुमार व्ही. पाटील म्हणाले, हे पॅकेज विशेषतः हार्मोनल उपचार आणि इतर लिंग-पुष्टीकरण प्रक्रिया घेत असलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी तयार केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हा उपक्रम अशा लोकांसाठी आहे ज्यांना विमा संरक्षण नाही आणि महागड्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत.
दोन्ही रुग्ण सध्या विश्रांती घेत असून त्यांची तब्येत ठीक असल्याचे डॉ. नेरुरकर यांनी सांगितले. डिसेंबरमध्ये ग्राफिक डिझायनरने तिचा आवाज स्त्रीलिंगी करण्यासाठी रुग्णालयाशी संपर्क साधला, तर गेल्या वर्षभरापासून हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेत असलेल्या मेकअप आर्टिस्टचीही तीच विनंती होती. आता या विशेष पॅकेजद्वारे दोघींना मदत करण्यात अली. ट्रान्स व्हॉइस पॅकेजचे महत्त्व अधोरेखित करताना, डॉ. नेरुरकर यांनी स्पष्ट केले, पुरुषांपासून स्त्री बनत असलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी, आवाज अनेकदा अडथळा बनतो. हार्मोनल उपचारांमुळे आवाज स्त्रीलिंगी होत नाही. त्यामुळे बरेच जण व्हॉइस मॉड्युलेशनवर अवलंबून असतात. यामुळे स्वर थकवा आणि मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे अशी आवाज बदलण्याची शस्त्रक्रिया फायदेशीर ठरू शकते. (हेही वाचा: India's First Transgender Judge: देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश Joyita Mondal यांची IMP सूचना, 'या' समूहालाही मिळावे आरक्षण)
अनुदानित पॅकेजबाबत त्या म्हणाल्या, अनेक ट्रान्समहिला कमी सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून येतात आणि त्यांना आवाज बदलण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. ट्रान्स व्हॉइस पॅकेज हे ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी त्यांच्या संक्रमण प्रवासातील सर्वात महत्त्वाचा एक पैलू असून, ते त्यांना समाजात समाकलित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. डॉ. नेरुरकर यांनी साधारण 60 हून अधिक ट्रान्स व्हॉइस शस्त्रक्रिया केल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

