N-95 Masks with Valved Respirators बाबत केंद्र सरकारने जारी केल्या नव्या सूचना; जाणून घ्या हा मास्क का हानिकारक!
दरम्यान ती हानिकारक असल्याचे आता केंद्र सरकार कडून सांगण्यात आले आहे.
कोरोना संकटकाळात कोविड 19 च्या विषाणूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र आता N-95 मास्कबाबत सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारने आता देशातील सारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना व्हॉल्व्ह असलेली N-95 वापरल्याने कोरोना विषाणूंपासून संसर्ग टाळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान ती हानिकारक असल्याचे आता सांगण्यात आले आहे.
भारताच्या आरोग्य मंत्रालयामधील DGHS कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये Principal Secretaries of health and medical education of states ना सांगण्यात आले आहे की,'समाजात N-95 मास्कचा आणि प्रामुख्याने व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कचा चूकीच्या पद्धतीने वापर होत असल्याचं निदर्शनास आले आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणेतील विशिष्ट वर्ग वगळता इतरांनी तो वापरणं हे हानिकारक आहे.' त्यामुळे सामान्यांना घरगुती कापडी किंवा सर्जिकल मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
N-95 मास्क वापरणं हानिकारक कसे?
N-95 मास्कचा वापर प्रामुख्याने प्रदुषित वातावरणातील अतिसूक्ष्म कण श्वसनमार्गात जाऊ नये म्हणून केला जातो. दरम्यान या मास्क मधील 95 ही संख्या 95% हवा फिल्टर होत असल्याचे संकेत देते. त्यामुळे चेहर्यावर तो घातल्यानंतर हवा आत-बाहेर जाण्यावर बंधनं येतात. अनेकांना यामुळे श्वास घेणे, सोडणे कठीण वाटते. त्यामुळेच मास्क वर देखील तशा सूचना दिल्या आहे.
N-95 मास्कमध्ये म्हणूनच व्हॉल्व्ह असलेले काही मास्क उपलब्ध करण्यात आले ज्यामुळे हवा बाहेर फेकण्यास एक मार्ग राहील. पण कळत नकळत कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क घातला असेल तर त्याच्यामुळे खोलीत त्याच्या उच्छ्श्वासातून हवेमार्फत, वस्तूवर कोरोना व्हायरस बाहेर पडू शकतो. त्यामुळे हा व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे.
सध्या केवळ विशिष्ट डॉक्टर्स हा व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क घालू शकतात. मात्र सामान्यांना घरामध्ये बनवलेला सामान्य कापडी, 3 लेयर्सचा मास्क सुरक्षित आहे. सर्जिकल मास्क देखील सुरक्षित असल्याचं सरकारने यापूर्वीच जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. मात्र कापडी मास्क वापरत असाल तर तो स्वच्छ धुवून वापरणं आणि हाताळणं गरजेचे आहे. Covid 19 चा संसर्ग टाळण्यासाठी वापरलेले मास्क Disinfect कसे कराल? जाणून घ्या मास्क स्वच्छ करण्याची योग्य पद्धत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,आज मागील 24 तासात देशात 37,148 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तसेच 587 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 11,55,191 वर पोहचला आहे. यापैकी 4,02,529 अॅक्टिव्ह रूग़्ण आहेत. तर आजपर्यंत 7,24,578 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दुर्दैवाने आजवर 28084 जणांचा मृत्यू झाला आहे.