Norovirus in Kerala: केरळमध्ये नोरोव्हायरसच्या 2 रुग्णांची नोंद; नोरोव्हायरस म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
नोरोव्हायरस अत्यंत संसर्गजन्य आहे असून तो दूषित अन्न, पाणी आणि पृष्ठभागांद्वारे पसरतो.
Norovirus in Kerala: देशात कोरोना (Coronavirus) महामारी पूर्णपणे संपलेली नाही. अशातचं आता नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) मधील दोन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोरोव्हायरसची (Norovirus) लागण झाल्याचे आढळून आले. उलट्या, जुलाब आणि ताप ही या आजाराची लक्षणे आहेत. नोरोव्हायरस अत्यंत संसर्गजन्य आहे असून तो दूषित अन्न, पाणी आणि पृष्ठभागांद्वारे पसरतो. केरळच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आणखी काही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी असे मानले जात आहे की, शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या दुपारच्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे.
माध्यान्ह भोजन सुरक्षित करण्यासाठी कोणती पावले उचलली जावीत यावर चर्चा करण्यासाठी शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वायनाडमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 12 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व्हायरसची लागण झाली होती. (हेही वाचा - Side Effects of Painkillers: तुम्हीही पेनकिलर घेता का? सामान्य वेदनाशामक औषधांचे शरीरावर होतात 'हे' दुष्परिणाम, अभ्यासात झाला खुलासा)
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, विझिंजममध्ये नोरोव्हायरसच्या 2 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. काळजी करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाने परिस्थितीचा अंदाज घेतला आहे. परिसरातून नमुने गोळा करून त्याची चाचणी करण्यात आली असून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे.
नोरोव्हायरस म्हणजे काय?
नोरोव्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे. ज्यामुळे अतिसार आणि उलट्या होतात. नोरोव्हायरस कोणालाही संक्रमित आणि आजारी करू शकतो.
नोरोव्हायरस कारणे -
संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क करणे, दूषित अन्न किंवा पाणी पिणे किंवा दूषित पृष्ठभागांना स्पर्श करणे आणि न धुलेले हात तोंडात घालण्याने नोरोव्हायरसचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.
नोरोव्हायरस लक्षणे -
अतिसार, उलट्या, मळमळ आणि पोट बिघडणे ही नोरोव्हायरस लक्षणे आहेत. तर ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी हे संभाव्य दुष्परिणाम आहेत.
नोरोव्हायरस संक्रमणापासून वाचण्याचे उपाय -
आपले हात वारंवार धुवून, फळे-भाज्या स्वच्छ धुवून, शेलफिश पूर्णपणे शिजवून नोराव्हायरसचे संक्रमण रोखले जाऊ शकते. याशिवाय आजारी असताना तसेच लक्षणे थांबल्यानंतर दोन दिवस घराबाहेर जाणं टाळा. तथापी, लक्षणे थांबल्यानंतर दोन दिवसांसाठी इतरांसाठी अन्न तयार करणे टाळून स्वतःला आणि इतरांना नोरोव्हायरसचे संक्रमण होण्यापासून थांबवा.