Smartphone Addiction: सतत फोन चेक करण्याची सवय ठरू शकते घातक; मेंदूवर होत आहे अनेक दुष्परिणाम, अभ्यासात धक्कादायक खुलासा
याचे कारण म्हणजे अशा लोकांचा फोकस ढासळणे हे होय.
आजकालच्या जीवनशैलीचा (Lifestyle) लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. लोकांनी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक चुकीच्या सवयी अंगीकारल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या मेंदू आणि शरीरावर वाईट परिणाम होतो तसेच आरोग्यासंबंधीही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. यातीलच एक म्हणजे फोनचे (Smart Phone) व्यसन. लोक त्यांच्या मोबाईल फोनशी इतके जोडले गेले आहेत की, दिवसभरात हजारो वेळा ते त्यांचा फोन तपासत असतात.
वारंवार फोन चेक करण्याची सवय त्यांच्या मेंदूवर वाईट परिणाम करू शकते. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार स्मार्टफोन तपासल्याने मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर संशोधन केले. संशोधनात असे आढळून आले की, सर्व वयोगटातील लोकांचा स्क्रीन टाइम वाढत आहे आणि फोन वारंवार तपासणे धोकादायक ठरत आहे.
ब्रिटीश जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, फोन वारंवार चेक केल्याने दैनंदिन जीवनातील लहान-लहान समस्या सोडवण्याची क्षमता कमी होऊ शकते. सतत फोन तपासण्याच्या सवयीमुळे त्वरित निर्णय घेण्याची वृत्ती कमकुवत होऊ शकते. अभ्यासात असे आढळून आले की, लोक जीवनातील छोट्या-छोट्या समस्यांपासून आपले लक्ष हटवण्यासाठी फोनचा वापर करू लागले आहेत.
कंटाळा कमी करायचा असेल किंवा टाइमपास करायचा असेल, तर ते त्यांच्या स्मार्टफोनमध्ये बिझी होतात. त्यामुळे त्यांचे मेंदूवरील नियंत्रण कमी होत असून, काम अपूर्ण सोडणे, मन किंवा मेंदू विचलित होणे अशा समस्या वाढू लागल्या आहेत. स्मार्टफोन वापरण्याच्या सवयीमुळे लोक बोलत असताना शब्द विसरायला लागतात. या संशोधनाचे मुख्य संशोधक आंद्रे हार्टांतो यांच्या मते, स्मार्टफोनमुळे जरी काही कामे सोपी झाली असली तरी, आता लोकांना नकळतपणे गरज नसतानाही स्मार्टफोन तपासण्याची सवय लागली आहे. (हेही वाचा: Marburg Virus Outbreak: कोरोनानंतर आता मारबर्ग व्हायरसचा उद्रेक, अनेक लोकांचा मृत्यू; WHO अलर्ट मोडवर, जाणून घ्या लक्षणे)
विद्यापीठाने अभ्यासासाठी आयफोन वापरकर्त्यांची निवड केली. हे लोक मोबाईल वापरण्याच्या पद्धती, एकूण वेळ आणि किती वेळा मोबाईल वापरतात याचा तपास करण्यात आला. आठवडाभर अॅपच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलवर नजर ठेवण्यात आली आणि असे आढळून आले की, जे लोक वारंवार फोन तपासतात त्यांची अनेक कामे अपूर्ण राहतात. याचे कारण म्हणजे अशा लोकांचा फोकस ढासळणे हे होय. अशा लोकांना संभाषणादरम्यान योग्य शब्द वापरता येत नाहीत, कारण ते बोलत असताना शब्द विसरतात.