No Doubt on Indian Vaccines: 'भारतामधील लसींच्या परिणामकारकतेबद्दल कोणतीही शंका नाही, त्या नक्कीच नागरिकांना संरक्षण प्रदान करतील'- Mansukh Mandaviya

गुरुवारी देशात 594 ताज्या प्रकरणांची नोंद झाल्यामुळे, भारतात एकूण सक्रिय कोविड-19 प्रकरणांची संख्या गुरुवारी 2,669 झाली. केरळमध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

Dr Mansukh Mandaviya (PC - ANI)

No Doubt on Indian Vaccines: देशातील अनेक राज्यांमध्ये आढळून आलेल्या SARS-CoV2, JN.1 च्या नवीन प्रकाराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी गुरुवारी सांगितले की, भारतामधील लसीकरणाच्या परिणामकारकतेबद्दल कोणतीही शंका नाही आणि सध्या देशात उपलब्ध असलेल्या लसी या नक्कीच नागरिकांना संरक्षण प्रदान करतील.

आतापर्यंत, JN.1 कोविड प्रकाराची 21 पुष्टी झालेली प्रकरणे आहेत. गुरुवारी देशात 594 ताज्या प्रकरणांची नोंद झाल्यामुळे, भारतात एकूण सक्रिय कोविड-19 प्रकरणांची संख्या गुरुवारी 2,669 झाली. केरळमध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

या पार्श्वभूमीवर मांडविया यांनी नमूद केले की, ‘आमच्या लसी सर्व प्रकारांवर काम करतील आणि त्या मृत्यूपासून बचाव करतील. कोविड-19 हा आता व्हायरलचा प्रकार बनला आहे आणि त्यात उत्परिवर्तन होत राहतील आणि नवीन प्रकरणे समोर येत राहतील, मात्र त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.’

तज्ञांचे मत आहे की, पाश्चात्य देशांप्रमाणे जेथे कोविड-19 च्या प्रकारात बदल झाल्याने लसींमध्ये बदल केले गेले आहेत, भारतात तशी परिस्थिती नाही. भारतातील लस निर्मात्यांनी त्यांच्या लसीमध्ये बदल केलेला नाही आणि इतके दिवस तेच डोस दिले जात आहेत. इतर देशांमध्ये, लस निर्माते व्हेरिएंटनुसार डोस बदलत आहेत.

कोविडला आता बराच काळ लोटला आहे, त्यामुळे लोकांनी लस घेतली तरी त्यांना कोविडची लागण होण्याची दाट शक्यता असते आणि हा प्रकार त्याच्या प्रथिनांच्या वाढीमुळे जास्त प्रमाणात संक्रमित होतो. ओमिक्रॉन सतत उत्परिवर्तन करत राहतो. XBB सब-व्हेरियंटच्या उदयानंतर, द्विसंधी लसी कमी प्रभावी झाल्या आणि लस उत्पादकांनी आता XBB उप-प्रकारांवर मात करतील अशा लशी विकसित केल्या. (हेही वाचा: कोरोना जेएन-वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य यंत्रणा सज्ज; CM Eknath Shinde यांचे प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन)

युरोपियन युनियन (EU) ने दोन mRNA लसींना अधिकृत केले आहे. यामध्ये Moderna च्या mRNA-1273.815 आणि Pfizer च्या XBB.1.5 BNT162b2 लसींचा समावेश आहे, ज्या XBB.1.5 उप-व्हेरियंटच्या स्पाइकला एन्कोड करतात. मात्र भारतात अस्तित्वात नाही. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य आरोग्य विभाग यांच्यात सणासुदीच्या काळात देशातील कोविड प्रकरणांमध्ये संभाव्य वाढीबद्दल चर्चा करण्यासाठी एक बैठक देखील आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

मे महिन्यात डब्ल्यूएचओने (WHO) कोविड-19 यापुढे जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले होते. JN.1 चा प्रकारचा जरी झपाट्याने प्रसार होत असला अत्री, त्यास ‘कमी’ जागतिक सार्वजनिक धोका असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, देशात आणि महाराष्ट्रात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश दिले. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.