तापाशिवायही बळावतोय 'डेंग्यू' , AIIMS च्या डॉक्टरांचा खुलासा , या लक्षणांनी ओळखा तापाशिवाय वाढणार्‍या डेंग्यूचा धोका

या खुलाशावर डॉक्टरांनी एक केस स्टडी सादर केली आहे.

तापाशिवाय डेंग्यू लक्षणं Photo Credit :Pixabay

ऋतूमानामध्ये बदल झाला की आजारपण डोकं वर काढतंच. अचानक वाढणारा ताप हे डेंग्यूंचं एक प्रमुख लक्षण आहे. आता आता आजारपणाच्या लक्षणांमध्येही ठळकपणे बदल होत आहेत. AIIMS च्या डॉक्टरांनी केलेल्या खुलाशानुसार, तापाचं लक्षण न दिसताही शरीरात डेंग्यूचा व्हायरस वाढू शकतो. या खुलाशावर डॉक्टरांनी एक केस स्टडी सादर केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 50 वर्षीय एका रूग्णाला डेंग्यूचं निदान झालं होतं, मात्र लक्षणांमध्ये ताप कुठेच नव्हता. सतत थकवा जाणवत असल्याने या रूग्णाच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमधून डेंग्यूचं निदान करण्यात आलं. रक्ताच्या चाचणीमध्ये साखर आणि अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक होतं. लाल आणि पांढर्‍या रक्तपेशी अत्यंत कमी होत्या.

Journal of the Association of Physicians of India मध्ये एम्सच्या डॉक्टरांनी ही केस स्टडी प्रकाशित केली आहे. ताप नसला तरीही रक्तात प्लेटलेट्सची संख्या कमी असणं, रक्तपेशी कमी असणं हे डेंग्यूंचं निदान करण्यासाठी महत्त्वाचं लक्षण आहे. प्रामुख्याने डेंग्यूची साथ असल्यास या लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. डेंग्यूमध्ये तापाचं लक्षण न दिसणं हे वयोवृद्ध आणि मधुमेही रूग्णांमध्ये आढळतं.