लाईफस्टाईलमधील या 5 चूकांमुळे जडतो व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास
व्हेरिकोस व्हेन्सचा वेदनादायी त्रास जडण्यापूर्वीच या सवयी सोडा
व्हेरिकोस व्हेन्स हा अत्यंत वेदनादायी त्रास आहे. अनेकदा सुरूवातीच्या टप्प्यावर व्हेरिकोस व्हेन्सकडे दुर्लक्ष केलं जातं. व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न रहता त्यावर मात करण्यासाठी वेळीच वैद्यकीय मदत घेणंही आवश्यक आहे. मसाज, फिजिओथेरपीने व्हेरिकोस व्हेन्सवर मात करता येते. मात्र हा त्रास अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहचला असेल तर रूग्णावर शस्त्रक्रियाही केली जाते. क्वचित जीवघेणा ठरणारा हा व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास नेमका कशामुळे जडतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
फार काळ उभं राहणं
काहींना नोकरीचा एक भाग म्हणून सतत उभं रहावं लागतं. एकाच जागी फार काळ उभं राहिल्यास व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढतो. एकाच जागी उभं राहण्यापेक्षा थोडं चाला, फिरा. अन्यथा पायांवर ताण येतो. रक्त साखळण्याचा धोका वाढतो. हळूहळू रक्तवाहिन्यांमधील व्हॉल्वकहे नुकसान होते.
फार काळ बसणं
जसं एकाच ठिकाणी उभं राहणं त्रासदायक आहे तसेच बसून राहणंदेखील आरोग्याला नुकसानकारकच ठरते. डेस्क जॉब असणार्यांना हा त्रास अधिक जाणवतो. फार काळ बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढण्यासोबतच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रासही वाढतो. त्यामुळे ठराविक वेळाने उठून इतरत्र काही वेळ फिरा.
हाय हिल्स
हिल्स घालणं मुलींना फार आवडतं पण त्यामुळे आरोग्यावर नकळत काही परिणाम होऊ शकतो. हिल्स घालून चालल्याने रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येतो. परिणामी व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास बळावतो.
मीठ अति खाणं
वेफर्स, लोणचं, पापड यामध्ये मीठ अधिक असते पण त्याचा आहारात अधिक प्रमाणात समावेश केल्यास व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढू शकतो. मीठामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि त्याचा ताण रक्तवाहिन्यांवर येतो.
पाय क्रॉस करून बसणं
पायांवर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे पायांवर आणि हिप्सवरही ताण येतो. यामुळे रक्तवाहिन्या फुगतात. हळूहळू जाळं वाढतं.