Intranasal VaccIine: भारत बायोटेकची नाकावाटे घेतली जाणारी लस iNCOVACC ला मंजुरी; बूस्टर डोस म्हणून दिली जाणार
जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, ग्रीस, इटली यांसारख्या देशांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि कोविडमुळे मृत्यू होत आहेत.'
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी गुरुवारी सभागृहात सांगितले की, तज्ज्ञ समितीने कोरोना विषाणूच्या (Coronavirus) अनुनासिक लसीला (Intranasal Vaccine) मंजुरी दिली आहे. याचा अर्थ येत्या काही दिवसांत कोविड-19 विषाणूपासून बचाव करण्यासाठी इंजेक्शनची गरज भासणार नाही, तर तुम्ही नाकावाटे कोरोनाची लस घेऊ शकता.
याआधी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (Bharat Biotech) ने 28 नोव्हेंबर रोजी माहिती दिली होती की, त्यांच्या नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या अँटी-कोविड-19 लस इनकोव्हॅक (iNCOVACC -BBV154) ला भारतातील 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडून (CDSCO) आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. इनकोव्हॅक ही जगातील पहिली अशी इंट्रानेजल लस आहे जिला, प्रायमरी सिरीज आणि हेटरोलॉगस बूस्टर मंजूरी प्राप्त झाली आहे.
कंपनीने सांगितले की, तीन टप्प्यात या लसीची क्लिनिकल ट्रायल झाली आहे. त्यामधील यशस्वी निकालानंतर नाकात थेंब टाकण्यासाठी ही लस खास विकसित करण्यात आली आहे. लस उत्पादकाने सांगितले की BBV154 विशेषत: नाकावाटे घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यासोबतच नाकातून लस घेण्याच्या प्रणालीची रचना आणि विकास अशा प्रकारे करण्यात आला आहे की, ती कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडेल.
दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले की, 'कोरोना जागतिक महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, ग्रीस, इटली यांसारख्या देशांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि कोविडमुळे मृत्यू होत आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने सुरुवातीपासूनच कोविड-19 महामारीचे व्यवस्थापन केले आहे, ज्याचे आम्हाला चांगले परिणामही मिळाले आहेत.’ (हेही वाचा: चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा कहर; भारतातही झाली विषाणूची एंट्री, काय आहेत BF7 विषाणूची लक्षणं)
ते पुढे म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून आतापर्यंत 220.2 कोटी कोविड-19 लस टोचून विक्रम केला आहे. यामध्ये 90 टक्के पात्र लोकसंख्येला दोन्ही लसी मिळाल्या आहेत आणि 22.35 कोटी लोकांना बुस्टर डोसही देण्यात आला आहे. चीन आणि इतर देशांमधील वाढत्या कोविड संख्येवर केंद्र बारकाईने लक्ष ठेवून आहे.’