Summer Skin Care: सनस्क्रीम वापरताय? रसायनांनी होणारा धोका टाळण्यासाठी 'या' गोष्टी तपासून घ्या
वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण सनस्क्रीमचा वापर हमखास करत असतो, मात्र या क्रिम मधील हानिकारक रसायनांमुळे शरीराला हानी पोहचते हे तुम्हाला ठाऊक आहे का ?त्वचेची हेळसांड टाळण्यासाठी क्रीम निवडताना हे घटक नक्की तपासून पहा.
Summer 2019: वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जण नाना तऱ्हा अवलंबत असतो. फेस मास्क,(Face Mask) बॉडी लोशन्स(Body Lotions), एक ना अनेक हजार प्रकारच्या क्रीम्स लावून आपल्या त्वचेचं उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न तुम्हीही करत असाल, पण थांबा! या फॅन्सी सनस्क्रीम (Sunscreen) मध्ये शरीराला हानिकारक रसायने (Harmful Chemicals) मिसळली असू शकतात. सौंदर्य विषयातील अभ्यासक व त्वचा डॉक्टर्सच्या माहितीनुसार, हे सनस्क्रीम सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांपासून (UV Rays) त्वचेचं रक्षण करून त्वचेचं वाढत वय (Skin Ageing), डार्क स्पॉट्स (Dark Spots) इतकंच नव्हे तर कॅन्सर (Cancer) सारख्या आजारांपासून दूर ठेवण्याचा दावा करतात. मात्र नुकत्याच पार पडलेल्या एका परीक्षणात काही क्रीम्स मध्ये वापरलेले हानिकारक रसायन हे क्रीमवाटे रक्तात मिसळून त्वचेच्या आजाराला आमंत्रण देऊ शकतात.
रसायनाचे प्रमाण वाढते
JAMA मध्ये २३ जणांसोबत केलेल्या परीक्षणात प्रत्येक व्यक्तीला75% शरीरावर सलग चार दिवस दिवसातून चार वेळा सनस्क्रीम लावण्यास सांगितले गेले. त्यानंतर समोर आलेल्या निकालात या व्यक्तींच्या शरीरातील रक्तात अवोबेंझॉन (Avobenzone),ऑक्सिबेंझॉन (Oxybenzone), (Ecamsule) आणि ओक्टोकार्लेन (Octocrylene) या रसायनांची मात्रा वाढलेली आढळून आली. हे प्रमाण शरीराला हानी पोहचवत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय मात्र अभ्यासकांनी सनस्क्रीमचा पूर्णपणे वापर बंद करण्याचे आवाहन केलेले नाही हे देखील परीक्षणात स्पष्ट केले आहे.
जाणून घ्या सनस्क्रीमचे प्रकार
सनस्क्रीम तुमच्यासाठी योग्य आहे का याचा अंदाज घेण्याआधी सनस्क्रीमचे प्रकार जाणून घेणे आवश्यक आहे. यानंतर आपल्या त्वचेचा प्रकार व त्यासाठी उपयुक्त सनस्क्रीमची निवड केल्यास त्वचेचे नुकसान टाळता येऊ शकते. तज्ञांच्या माहितीनुसार, सनस्क्रीमचे दोन प्रकार आहेत. यातील एक प्रकार हा त्वचा आणि सूर्यकिरणांमध्ये प्रत्यक्ष आवरण तयार करून त्वचेचं रक्षण करतो. यामध्ये झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम ऑक्साईड यासारखे नैसर्गिक घटक वापरलेले असतात जे यूव्ही किरणांना त्वचेपर्यंत पोहचण्यासाठी अडथळा निर्माण करतात.
उन्हाळ्यात हवी नितळ, मुलायम, निरोगी त्वचा? घरच्या घरी करा हे उपाय
तर दुसरा प्रकार म्हणजेच रासायनिक सनस्क्रीम या हानिकारक यूव्ही किरणांना शोषून घेऊन त्वचेचं रक्षण करतात. यामध्ये असणाऱ्या Oxybenzone, Octinoxate, Octisalate आणि Octocrylene रसायनांमुळे शरीरातील हॉर्मोन्सवर वाईट परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.
यावर पर्याय काय?
सूर्याच्या किरणांची वाढत जाणारी मात्रा पाहता सनस्क्रीमचा वापर पूर्ण पणे बंद करणे हे उचित ठरणार नाही. याशिवाय शरीरातील रसायन हे नेलपॉलिश, हेअर स्प्रे या उत्पादनांमुळे देखील वाढत असते.सनस्क्रीमचा वापर बंद करण्याऐवजी नीट तपासून योग्य क्रीम निवडल्यास व त्याचा मर्यदित वापर केल्यास होणार धोका टाळता येतो.
Summer 2019: उन्हाळयात केसांचे आरोग्य जपा,अशी राखा केसांची निगा
अशी घ्या खबरदारी
-शक्यतो क्रीम निवडताना ऑक्सिबेंझॉन रसायन नसलेली क्रीम घ्या, किंवा त्याचे प्रमाण कितपत आहे हे तपासून घ्या.
- रिटानिल पॅलॅमाइट किंवा व्हिटॅमिन Aने युक्त क्रीम घेणे टाळा. यासाठी क्रीमच्या ट्यूब किंवा पाकिटावर दिलेली घटकांची यादी नीट तपासून बघा.
-मिनरल सनस्क्रीम साधारण सर्व त्वचा प्रकारांसाठी उत्तम काम करतात. याशिवाय तुम्ही मिनरल व नॉन मिनरल घटकांचे मिश्रण असणाऱ्या कॉम्बिनेश क्रीम देखील निवडू शकता, मात्र केवळ नॉन मिनरल क्रीम्स घेणे प्रकर्षाने टाळा.
-स्प्रे स्वरूपात येणारी क्रीम घेऊ नका.या मध्ये नेमके किती प्रमाण घ्यावे याबाबत अनेकदा गोंधळ होऊ शकतो.
-त्वचेची गरज तपासून पहा, वॉटरप्रूफ किंवा घामापासून सुटका देण्याच्या खोट्या दाव्यांमध्ये अडकू नका.
- सूर्यापासून संरक्षण करणारे घटक किती प्रमाणात आहे हे तपासा, जास्त प्रमाण म्हणजे जास्त संरक्षण हा समज चुकीचा आहे.