तुमचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी मदत करेल गोड 'बडीशेप', वाचा गुणकारी फायदे
जाणून घेऊया या बडीशेप खाण्याचे महत्त्वाचे फायदे
अनेकांना जेवल्यानंतर बडीशेप (Fennel) खाण्याची सवय असते. तोंडाला वास येऊ नये आणि तोंडात रिफ्रेशमेंट वाटावं म्हणून आपण अनेकदा बडीशेप खात असतो. मात्र तुम्हाला हे माहित आहे का हिच बडीशेप तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी आणि सुदृढ शरीर बनविण्यासाठी मदत करते. एवढंच नव्हे तर तुम्ही चिरतरुण रहावे यासाठी बडीशेप सारखी छोटीशी गोष्ट खूप महत्त्वपुर्ण भूमिका बजावते. कारण ह्या छोट्या बडीशेपमध्ये फॉस्फरस, आयर्न,सोडियम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम सारखे महत्त्वाचे तत्त्व आहेत. चला तर जाणून घेऊया या बडीशेप खाण्याने शरीरावर होणारे फायदे:
त्वचा:
बडीशेपमध्ये विटामिन सी आहे. बडीशेपच्या सतत सेवनामुळे आपल्या त्वचेची सपोर्ट सिस्टम खूप संतुलित राहते. अगदी छोटी दिसणारी ही बडीशेप आपल्या त्वचेचे सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि धुळीपासून संरक्षण करते. यामुळे आपल्या त्वचेमध्ये स्निग्धता टिकून राहते.
केस:
त्वचेबरोबरच केसांवरही बडीशेप खूप गुणकारी आहे. जर तुमच्या केसात कोंडा असेल किंवा तुमचे केस फार गळत असतील, तर तुम्ही बडीशेपचा वापर करु शकता. 3 चमचे बडीशेपची पावडर 2 ग्लास पाण्यात टाकून ते पाणी उकळून घ्यावे. पाणी चांगले उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवावे. केसांना शॅम्पू आणि कंडीशनर लावण्याऐवजी हे तयार केलेले पाणी वापरून केस धुवावे. बडीशेपमधील अँटीऑक्साइड मुळे तुमचे केस गळणे थांबते.
वजन:
अनेक ब्युटीशियन्स लठ्ठपणा कमी करण्यासाठी बडीशेप खाण्याचा सल्ला देतात. कारण बडीशेपमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी जळते आणि भूक कमी करते.
डोळे:
डोळ्याखाली काळे डाग येणे, लाल होणे, जळजळ होणे यांसारखे तुम्हाला डोळ्यांचा काही त्रास होतअसेल, खडीसाखरसह बडीशेप दिवसातून दोनदा खावी. डोळ्यात सूज आली असेल तर त्यावर बडीशेप खूपच गुणकारी आहे.
रक्तदाब:
उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी नियमितपणे बडीशेप खावी.
पोटाचे विकार:
जर तुम्हाला ढेकर येत असतील, मळमळल्यासारखे वाटत असेल, पोट खराब असेल तर खडीसाखरेसह बडीशेपचा सरबत बनवून प्यावा. दिवसातून दोन वेळा अर्धा-अर्धा ग्लास हा सरबत घ्यावा. तसेच तुम्ही बडीशेपची चहा बनवूनही पिऊ शकता. जेणेकरुन तुमची पोटातील जळजळ, पोट दुखणे यांसारख्या समस्या दूर होतील.
मूर्ती लहान पण किर्ती महान असलेली ही गुणकारी बडीशेप सर्वांना अवश्य खावी. त्याचे फायदे खरच खूप महत्त्वाचे आणि वाखाखण्याजोगे आहेत.
(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)