Heart Failure-Related Death: अविवाहित लोकांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा
परंतु अविवाहित लोकांमध्ये विवाहित लोकांपेक्षा सामाजिक मर्यादा आणि स्व-कार्यक्षमता यांचा स्कोअर खूपच वाईट होता.
विवाह (Marriage) ही केवळ एक सामाजिक व्यवस्था नाही, तर त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजी (ESC) च्या संशोधनात आढळून आले आहे की, जे लोक अविवाहित आहेत किंवा ज्यांना पार्टनर नाहीत त्यांना हृदयविकारामुळे (Heart Failure) मृत्यूचा धोका जास्त असतो. या अभ्यासानुसार, हृदयविकाराच्या समस्येने ग्रस्त अविवाहित लोकांच्या मर्यादित सामाजिक संबंधांमुळे, विवाहित लोकांपेक्षा त्यांची स्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात कमी असतो.
याच फरकामुळे, अविवाहित लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या निर्माण झाल्यानंतर जगण्याची शक्यता विवाहित लोकांच्या तुलनेने कमी असते. या अभ्यासाचे लेखक आणि जर्मनीतील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल वुर्जबर्ग येथील कॉम्प्रिहेन्सिव्ह हार्ट फेल्युअर सेंटरचे डॉ. फॅबियन केरवागेन म्हणतात की, सामाजिक समर्थन लोकांना दीर्घकालीन परिस्थिती व्यवस्थापित करण्यास मदत करते. तुमचे पार्टनर्स तुम्हाला औषध घेण्यास मदत करू शकतात किंवा ते त्यासाठी तत्परता दाखवू शकतात. यामुळे रुग्णांमध्ये हेल्दी बिहेव्हिअर विकसित होण्यास मदत होते. या सर्व घटकांचा दीर्घायुष्यासाठी सकारात्मक परिणाम होतो.
डॉ. फॅबियन यांच्या मते, या अभ्यासात समाविष्ट अविवाहित रुग्णांमध्ये विवाहित रुग्णांच्या तुलनेत सामाजिक संबंधांची कमतरता दिसून आली. यासोबतच हृदयविकारामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वासही कमी असल्याचे दिसून आले. या घटकांचा विचार करून, हे घटक आयुर्मानाशी देखील संबंधित असू शकतात का याचा तपास केला.
ई-आयएनएच अभ्यासामध्ये 2004 ते 2007 दरम्यान हृदयविकारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 1022 रुग्णांचा समावेश होता. यापैकी 1008 रुग्णांनी वैवाहिक स्थिती नोंदवली, त्यापैकी 633 म्हणजे सुमारे 67% विवाहित आणि 375 म्हणजे सुमारे 37% अविवाहित होते. यामध्ये विधवा किंवा विधुर (195), कधीही न लग्न केलेले (96) आणि घटस्फोटित (84) लोकांचा समावेश होता. (हेही वाचा: श्वासाची दुर्गंधी असलेल्या पुरुषांमध्ये उद्भवू शकते Erectile Dysfunction ची समस्या; अभ्यासात खुलासा)
विश्लेषणात असे आढळून आले की, विवाहित आणि अविवाहित रूग्णांमधील जीवनाच्या एकूण गुणवत्तेत किंवा उदासीन मनःस्थितीत कोणताही लक्षणीय फरक आढळला नाही. परंतु अविवाहित लोकांमध्ये विवाहित लोकांपेक्षा सामाजिक मर्यादा आणि स्व-कार्यक्षमता यांचा स्कोअर खूपच वाईट होता.