IPL Auction 2025 Live

Heart Attack Risk: हृदयविकाराच्या झटक्याचा सोमवारी सर्वाधिक धोका; नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा

परंतु असे का घडते याची कारणे फारशी स्पष्ट नाहीत.

Heart Attack |

हृदयविकाराचा झटका (Heart Attacks) हे जगभरातील अचानक मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार, कोरोनरी हार्ट डिसीज (CHD) हा हृदयविकाराचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे चार लाख लोकांचा मृत्यू होतो. एकट्या अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने 8 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. कोविड महामारीनंतर हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे अधिक नोंदवली जात आहेत, असे आरोग्य तज्ञ म्हणतात. याची अनेक कारणे असू शकतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी नोंदवले आहे की, सोमवार (Monday) हा आठवड्याचा असा दिवस आहे, ज्या दिवशी गंभीर हृदयविकाराचा धोका जास्त असू शकतो.

आतापर्यंत जीवनशैली आणि आहारविषयक समस्या हृदयविकाराच्या जोखमीशी जोडल्या गेल्या होत्या, मात्र एका नव्या अभ्यासात, हृदयविकाराच्या गंभीर आजाराचा विशिष्ट दिवसाशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

युकेच्या मँचेस्टर येथे ब्रिटिश कार्डिओव्हस्कुलर सोसायटी (BCS) परिषदेत सादर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 13% जास्त असू शकतो. कामाच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी गंभीर आणि जीवघेणा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतर कोणत्याही दिवसापेक्षा जास्त असू शकतो. यासाठी, संशोधकांनी 2013 ते 2018 दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र प्रकारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या आयर्लंडमधील 10,528 रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले. हा अभ्यास बेलफास्ट हेल्थ अँड सोशल केअर ट्रस्ट आणि आयर्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या डॉक्टरांनी केला आहे. (हेही वाचा: Chicken खाण्याचे शौकीन असाल तर वेळीच व्हा सावध; होऊ शकतो जगातील सर्वात धोकादायक आजार, WHO ने दिला इशारा)

संशोधकांनी डेटाचा अभ्यास केला आणि त्यात असे आढळले की, आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी हृदययासंबंधी जास्त तक्रारी असू शकतात, तर रविवारी हा दर लक्षणीयरीत्या कमी होते. परंतु असे का घडते याची कारणे फारशी स्पष्ट नाहीत. डॉक्टर सांगतात, सोमवारी लोकांवर कार्यालयात जाण्याचा ताण असतो. तणाव वाढल्याने शरीरात कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कार्डिओलॉजिस्ट डॉ जॅक लॅफन अहवालात स्पष्ट करतात की त्यांनी आठवड्याच्या सुरुवातीला अधिक STEMI प्रकरणे पाहिली आहेत. तीव्र हृदयविकाराचा झटका याला ST-सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI) असेही म्हणतात.

(टीप- लेखात नमूद केलेली माहिती ही इंटरनेटवरील अहवालांच्या आधारे घेतलेली आहे. त्याकडे व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आरोग्याची कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)