Glenmark Pharmaceuticals ने COVID-19 रूग्णांवर अॅन्टी व्हायरल Favipiravir औषधासह क्लिनिकल ट्रायलच्या तिसर्या टप्प्याला केली सुरूवात; ऑगस्ट 2020 पर्यंत अभ्यास पूर्ण होण्याची शक्यता
ग्लेनमार्क या मुंबई स्थित औषध निर्माण कंपनीने भारतामध्ये कोव्हिड 19 रूग्णांवर Favipiravir या अॅन्टी व्हायरल ड्रगच्या क्लिनिकल ट्रायलच्या तिसर्या टप्प्याला सुरूवात केली आहे.
ग्लेनमार्क (Glenmark Pharmaceuticals) या मुंबई स्थित औषध निर्माण कंपनीने भारतामध्ये कोव्हिड 19 रूग्णांवर Favipiravir या अॅन्टी व्हायरल ड्रगच्या क्लिनिकल ट्रायलच्या तिसर्या टप्प्याला सुरूवात केली आहे. दरम्यान ग्लेनमार्क ही भारतातील पहिली फार्मा कंपनी आहे, ज्यांना Drug Controller General of India कडून कोरोनाबाधितांवर ट्रायल करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान एप्रिल महिन्याच्या शेबटच्या काही दिवसांपासून ही ट्रायल सुरू आहे.
Favipiravir हे एक अॅन्टी वायरल औषध आहे. इंफ्लूएंजा वायरस विरूद्ध या औषधाने सकारात्मक परिणाम दाखवले आहेत. जपानमध्ये इंफ्लूएंजा वायरस विरूद्ध हे औषध वापरण्यास परवानगी आहे. दरम्यान ग्लेनमार्क कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायलसाठी देशभरातील 10 महत्त्वाच्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलकडून नोंदणी झाली आहे. या क्लिनिकल ट्रायलचा अभ्यास जुलै-ऑगस्ट 2020 पर्यंत हाती येऊ शकतात. सध्या कंपनीच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट टीमकडून प्रोडक्टचा कच्चा माल (API),फॉर्म्युलेशन(formulations) तयार आहे.
ग्लेनमार्क कंपनी क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या प्रमुख आणि उपाध्यक्ष डॉ. मोनिका टंडन यांनी दिलेल्या माहितीनुसार, " Favipiravir चा कोव्हिड 19 च्या रूग्णांवर होणारा परिणाम पाहण्यासाठी सध्या ग्लेनमार्क सह आरोग्यक्षेत्रातील इतर मान्यवर मंडळीदेखील उत्सुक आहेत. सध्या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी कोणतेही ठोस औषध नसल्याने आता हे परिणाम सकारात्मक येतील असा आम्हांला विश्वास आहे. "
भारतामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार गेला आहे. तर त्यापैकी 2293 जणांचा मृत्यू झाला असून 46,008 रुग्णांवर उपचार सुरु असून 22,455 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आज आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.