COVID-19 Vaccine Update: आजपासून मुंबई मधील केईएम हॉस्पिटलमध्ये Oxford-AstraZeneca च्या कोविड-19 वरील लसीच्या चाचण्यांना सुरुवात
एथिक्स समितीच्या परवानगीनंतर एकूण चार जणांना आज लसीचे डोस देण्यात येणार आहेत.
मुंबईतील (Mumbai) सरकारी केईएम रुग्णालयात (KEM Hospital) आज (26 सप्टेंबर) पासून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) कोविशिल्ड (Covishield) लसीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. एथिक्स समितीच्या परवानगीनंतर एकूण चार जणांना आज लसीचे डोस देण्यात येणार आहेत. त्यापैकी तीनजणांना ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस देण्यात येणार असून चौथ्या स्वयंसेवकाला प्लासीबो दिले जाईल. एकूण 13 जणांना लस देण्यात येणार असून त्यातील 10 लसी काल देण्यात आल्या. तर उर्वरीत 3 डोस आज देण्यात येणार आहेत, अशी माहिती हॉस्पिटलचे डिन डॉ. हेमंत देशमुख (Dr. Hemant Deshmukh) यांनी दिली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीची मानवी चाचणी होणारे केईएम हे मुंबईतील पहिले रुग्णालय आहे. (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सच्या स्थगितीनंतरही या वर्षाअखेरपर्यंत लस तयार होण्याची शक्यता; अॅस्ट्राझेनेका सीईओ Pascal Soriot)
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) संयुक्तपणे कोविड-19 वरील लस विकसित करत आहेत. तर भारतात भारतात सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून या लसीच्या चाचण्या केल्या जात आहेत. दरम्यान, युके मध्ये लस दिलेली व्यक्ती आजारी पडल्याने मध्यंतरी या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर Drug Controller General of India च्या आदेशानुसार भारतातील मानवी चाचण्याही थांबण्यात आल्या. तसंच युकेमध्ये जोपर्यंत ट्रायल्स पुन्हा सुरु होत नाही तोपर्यंत भारतातही ट्रायल्सला स्थगिती मिळाली. मात्र युके मध्ये चाचण्या सुरु झाल्यानंतर सिरीम इंस्टिट्यूटलाही चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली. (कोविड 19 विरूद्ध लस 2021 च्या सुरूवातीपर्यंत उपलब्ध होऊ शकते; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची राज्यसभेत माहिती)
युकेमध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स सुरु आहेत. यात भारतातील 17 विविध शहरांमधील तब्बल 1600 रुग्ण सहभागी झाले आहेत. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाची ही लस 2020 च्या अखेरपर्यंत तयार होईल असा अंदाज अॅस्ट्राझेनेका चे सीईओ Pascal Soriot यांनी व्यक्त केला आहे.