Cancer-Causing Chemicals In The Cars: सावधान! कारमधून प्रवास ठरु शकतो कर्करोगास निमंत्रण; घातक रसायनांचा श्वसनावाटे शरीरात प्रवेश- Report
म्हणजेच लोक जेव्हा त्यांच्या कारमध्ये असतात तेव्हा ते कर्करोगास कारणीभूत रसायनांच्या संपर्कात येतात.
Cancer-Causing Chemicals In The Cars: आजकाल कार (Car) ही मूलभूत गरजांचा भाग बनली आहे. गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील कार्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहेत. मात्र हे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कार तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम करू शकते. अलीकडील नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, लोक त्यांच्या कारमध्ये कर्करोगास (Cancer) कारणीभूत असणाऱ्या रसायनांमध्ये श्वास घेत आहेत. म्हणजेच लोक जेव्हा त्यांच्या कारमध्ये असतात तेव्हा ते कर्करोगास कारणीभूत रसायनांच्या संपर्कात येतात. उन्हाळ्यात या विषारी रसायनांचा प्रभाव गाडीच्या आत अधिक राहतो.
पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी 2015 आणि 2022 दरम्यान साधारण 101 इलेक्ट्रिक, गॅस आणि हायब्रिड कारच्या केबिन हवेच्या गुणवत्तेचे विश्लेषण केले. यामध्ये त्यांना आढळले की, 99% कारमध्ये TCIPP नावाचे ज्वालारोधक किंवा फ्लेम रिटार्डंट्स (Flame Retardants) असते. सध्या यूएस नॅशनल टॉक्सिकोलॉजी प्रोग्राम संभाव्य कार्सिनोजेन म्हणून त्याची तपासणी करत आहे. गाडीतील विविध घटकांना आग लागू नये म्हणून किंवा आगीचा प्रसार कमी करण्यासाठी फ्लेम रिटार्डंट्स केमिकल्स वापरली जातात. ही केमिकल्स गाडीच्या विविध घटकांवर लावली जातात.
बऱ्याच कारमध्ये आणखी दोन ज्वालारोधक आढळून आले- TDCIPP आणि TCEP, जे कर्करोगास कारणीभूत ठरतात. शास्त्रज्ञांच्या मते, हे ज्वालारोधक न्यूरोलॉजिकल आणि प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम करतात. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या मुख्य संशोधक आणि टॉक्सिकोलॉजी सायंटिस्ट रेबेका होहेन यांनी सांगितले की, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की एक ड्रायव्हर दररोज कारमध्ये सुमारे एक तास घालवतो. म्हणजेच तो तासभर अशा रसायनांच्या सानिध्यात असतो. ही बाब विशेषतः लहान मुलांबरोबरच लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठीही चिंतेची आहे. (हेही वाचा: Side Effects Of Covishield: 'कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांची माहिती आधीच देण्यात आली होती'; Serum Institute चे मोठे वक्तव्य)
अभ्यासात असे आढळून आले की, केबिन हवेतील कॅन्सर निर्माण करणाऱ्या संयुगेचा स्त्रोत सीट फोम आहे. कार उत्पादक कालबाह्य ज्वलनशीलता मानकांची पूर्तता करण्यासाठी सीट फोम आणि इतर घटकांवर केमिकल्स लावतात, जी कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. याबाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ लिडिया झहल यांनी सांगितले की, कार चालक खिडक्या उघडून आणि गाडी सावलीत किंवा गॅरेजमध्ये पार्क करून विषारी ज्वालारोधकांच्या संपर्कात येण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. परंतु सर्व प्रथम, कारमध्ये स्थापित फ्लेम रिटार्डंट्सचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे.