Breast Cancer Awareness Month : या '5' लक्षणांवरुन ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका !

या लक्षणांवरुन ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका...

ब्रेस्ट कॅन्सर (Photo Credits: waldryano/Pixabay)

आपल्या आयुष्याचा खरा साथीदार कोण असेल तर आपले आरोग्य. पण आपण विशेषतः स्त्रिया सर्व भूमिकांवर स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात त्याकडे अगदी दुर्लक्ष करतो. पण आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची ही आपली सवय आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अनेक आजार डोकी वर काढू लागतात. ब्रेस्ट कॅन्सर हा त्यापैकीच एक आजार. 

तणावग्रस्त जीवनशैली, ताण-तणाव, खाण्याच्या चूकीच्या वेळा आणि सवयी, निद्रानाश, फार लवकर वयात पाळी येणे, वयाच्या तिशीनंतरचे गरोदरपण, उशीराचे मोनोपॉज या लहान वाटणाऱ्या समस्या कॅन्सरचा धोका निर्माण करतात. म्हणूनच आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीलाच जाणवल्यास त्यावर उपाय करणे शक्य होते. या लक्षणांवरुन ओळखा कॅन्सरचा धोका...

ब्रेस्ट कॅन्सर होण्याची सामान्य कारणे

-वाढते वय

-पहिल्या बाळाच्या जन्मावेळी अधिक वय असणे

-अनुवंशिकता

-मद्यपानाचे अति प्रमाण

-अनहेल्दी लाईफस्टाईल

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

स्तनातून रसदार स्त्राव बाहेर पडणे

गरोदर स्त्रिया किंवा नवमातावगळता इतर स्त्रियांच्या स्तनातून स्त्राव होत नाही. मात्र जर स्तनातून रक्त किंवा स्त्राव बाहेर पडत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्तनांचा आकार बदलणे

सामान्य स्वरूपात स्तनाची स्थिती ही बाहेरच्या बाजूला अधिक असते. मात्र जर तुम्हांला ते आता ओढले गेल्याचे वाटत असल्यास किंवा त्यांची दिशा बदललेली आढळल्यास काहीतरी समस्या आहे, असे समजावे.

स्तनांच्या त्वचेचे स्वरूप बदलणे

स्तनांजवळील त्वचा ही मुलायम असते. परंतू त्वचेमध्ये काही बदल आढळून आल्यास ही धोक्याची घंटा समजावी. स्तनांजवळील त्वचा जाडसर जाणवल्यास त्याचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

गाठी

स्तनाजवळ जाडसर आणि वेदनारहित गाठी आढळल्यास मॅमोग्राफी करून घ्या. केवळ स्पर्शज्ञानाने तुम्ही गाठी ओळखू शकता. यासाठी किमान महिन्यातून एकदा ब्रेस्ट सेल्फ एक्झाम करा. सेल्फ ब्रेस्ट एक्झामने घरच्या घरी सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

काखेत गाठ आढळणे

काखेत गाठ असणे हे सामान्य आहे. परंतू त्याला हात लावल्यानंतर वेदना होणे किंवा सूज आढळणे हे ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते.

ब्रेस्ट कॅन्सर रोखण्याचे उपाय

-शारीरिकरित्या अधिक सक्रिय व्हा. नियमित व्यायाम करा.

-रेड मीटचे सेवन कमी प्रमाणात करा.

-ध्रुमपान टाळा.

-मीठाचे सेवन नियंत्रित ठेवा.

-सूर्यकिरणांच्या सान्निध्यात अधिक वेळ राहणे टाळा.

-गर्भनिरोधक गोळ्यांचे (contraceptive pill)सातत्याने सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ब्रेस्ट कॅन्सरचे योग्य निदान करण्यासाठी वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच शरीरात होणारे बदल आणि त्यातून मिळणार्‍या संकेताकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.