Eye Infection in Dhule: आळंदीनंतर आता धुळ्यात 'डोळे येण्या'ची समस्या; वेगाने पसरतोय संसर्ग, जाणून घ्या लक्षणे व कशी घ्याल काळजी
महत्वाचे म्हणजे हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, पुण्यातील देवाची आळंदी परिसरात तब्बल 1,600 मुले कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच ‘डोळे येणे’च्या समस्येने ग्रस्त आहेत. आता अशीच साथ धुळ्यातही आली आहे. धुळ्यातील अनेक लोक ‘डोळे येणे’ या नेत्ररोगाशी सामना करत आहेत. महत्वाचे म्हणजे हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डोळे आल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारामुळे आले आहेत, याचे निदान करून उपचार व्हावेत यासाठी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधने गरजेचे आहे.
डोळे का येतात?
डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्याने तो संसर्गावाटे पसरतो. यासह इन्फेक्शन आणि एलर्जीमुळेही हा रोग होऊ शकतो. अनेकदा वातावरणातील बदलामुळेही हा आजार होऊ शकतो. (हेही वाचा: Dengue Symptoms And Treatment: पावसाच्या पाण्यात झपाट्याने वाढतात डेंग्यूचे डास; 'ही' लक्षणे दिसल्यास करा त्वरित तपासणी)
डोळे येण्याची लक्षणे-
डोळ्यांमध्ये काहीतरी टोचल्यासारखे वाटणे
डोळे लाल होणे
डोळ्यांतून सुरुवातीला पाणी, नंतर चिकट घाण येऊ लागते.
सकाळी उठल्यावर दोन्ही पापण्या चिकटल्या जातात.
डोळ्यांची सतत जळजळ होणे
डोळ्याचा पांढरा भाग लालसर किंवा गुलाबी होणे
डोळ्यांना प्रकाशाची संवेदनशीलता
उपाय-
आपणास वरील कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या व त्यानुसार औषधे सुरु करा.
डोळे येणे संसर्गजन्य असल्याने, तो कपडे व हवा यांमार्फत पसरतो. त्यामुळे एकमेकांचे कपडे, हातरुमाल, चष्मे वापरू नये.
हा संसर्ग टाळण्यासाठी, आपले हात वारंवार धुवा, आपल्या हातांनी आपल्या डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नका आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा.
डोळ्यांना स्पर्श केल्यास त्वरित हात धुवा.
जर बाहेर जाणे अधिक महत्त्वाचे असेल तर डार्क चष्मा घालून जा.
शाळा, कॉलेज, चित्रपट, बाजार, ऑफिस आदी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.