पूजेव्यतिरिक्तही आरोग्यासाठी उपयुक्त आहे कापूर; जाणून घ्या काय आहेत फायदे

याचा वापर अनेक प्रकारचे मलम तयार करताना देखील होतो

कपूर (Photo credit : Healthyliving from Nature)

पूजा-अर्चाच्या वेळी कापूरचे अनन्यसाधारण महत्व असते. आरतीवेळी तर हमखास कापूर वापरलाच जातो. मात्र कापूर हा पूजा-आरती करण्याच्या व्यतिरिक्तदेखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कापूर अनेक आजार दूर करण्यासाठी एक औषधी घटक म्हणून वापरला जातो. याचा वापर अनेक प्रकारचे मलम तयार करताना देखील होतो. कापूर किंवा कापूरचे तेल केसांसाठी आणि त्वचेच्या रोगांसाठीही खुप चांगले मानले जाते. चला तर पाहूया काय आहेत कापूरचे आरोग्यदायी फायदे.

> शरीराच्या कोणत्याही भागावर खाज सुटली असेल, किंवा वारंवार खांजवण्याचा त्रास होत असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून हे मिश्रण खाज सुटलेल्या जागी लावावे. यामुळे ती जागा थंड पडून तुम्हाला लवकर आराम मिळेल.

> जुन्या सांदेदुखीच्या त्रासावर कापूर हे अत्यंत गुणकारी औषध आहे. वेदना होत असलेल्या जागी कापूरचे तेल लावून मालिश करा यामुळे वेदना दूर होईल.

> केस काळेभोर, लांब, मजबूत करण्यासाठी अथवा डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून कापूर वापरला जातो. यासाठी कापूरचे तेल तुमच्या रोजच्या वापराच्या तेलात मिसळून हलक्या हाताने केसांची मालिश करा लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.

> टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडेसे कापूर आणि मीठ टाकून त्यात थोडावेळ पाय सोडून बसा. त्यानंतर पाय आणि टाचा स्क्रब करून त्यावर मॉस्चराइजर क्रीम लावा. या उपायाने टाचांच्या भेगा नष्ट होऊन पाय एकदम मुलायम होतील.

> कापूरमध्ये अँटीबायोटिक्स असतात जे जखम बरी करण्यास मदत करतात. ज्या ठिकाणी जखम झालेली असेल किंवा कापले असेल त्या ठिकाणी कापूरमध्ये पाणी मिक्स करून लावा. यामुळे वेदना कमी होऊन लवकरच ती जखम भरून येईल. तसेच जळले किंवा भाजले असल्यास कापूरचे तेल खूप उपयोगी आहे, या तेलाने त्वचेची आग कमी होते.

> कापूर, ओवा आणि पेपरमिंट यांचे व्यवस्थित मुरलेले मिश्रण (यासाठी या तीनही गोष्टी एकत्र करून थोडावेळ उन्हात ठेवा) बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाकून घेतल्याने पोटदुखी थांबते. तसेच जुलाब झाले असतील तर हेच मिश्रण जुलाबापासूनदेखील आराम देईल.