Egg Prices in Mumbai Skyrocket: अंडी महागली; भाव प्रति डझन 96-108 रुपयांवर; जाणून घ्या मुंबई आणि उपनगरांतील दर
जानेवारीच्या मध्यापर्यंत दर जास्त राहू शकतात, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये अंडी ही प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत (Protein Source) म्हणून ओळखली जातात. राज्याची राजधानी मुंबई हिसुद्धा त्याला अपवाद नाही. दरम्यान, या शहरामध्ये अंडी दर (Mumbai Egg Rates) कडाडले आहेत. इतके की, किरकोळ बाजारात अंडी प्रति डझन 96 ते 108 रुपये दराने विकली जात आहेत. हिवाळा सुरु झाला की, अंडी, चिकन आणि मांसाच्या मागणीत विक्रमी वाढ होते. असे असले तरी, दरवर्षीची विक्री विचारात घेता मागणी आणि पुरवठा तुल्यबळ राहतो. परिणामी अंड्यांच्या किमती फारशा वाढत नाहीत. यंदा मात्र हे गणित बिघडले आहे, हिवाळा सुरू (Winter Shortage) झाल्यामुळे दक्षिण भारतातील उत्पादन टंचाईमुळे घाऊक किंमतीही सातत्याने वाढत आहेत.
शहरव्यापी दर आणि वाढती मागणी
मुंबई शहरात अंड्यांची वाढती मागणी आणि तुलनेत घटलेला पुरवठा दरवाढीस कारण ठरतो आहे. परिणामी पाठिमागील काही दिवसांपासून अंडी महाग दराने विकली जाऊ लागली आहेत. त्यामुळे नेहमीच्या खवय्यांना आणि हंगामी खव्यांनाही महागाईचा चटका बसतो आहे. शहर आणि उपनगरांतील अंड्यांच्या किंमती मंगळवारी खालीलप्रमाणे होत्या.
(सर्व दर प्रति डझन)
- वांद्रे: 96-108 रुपये
- जोगेश्वरी: 96-100 रुपये
- माहीममधील घाऊक दुकानात: 88 रुपये
- ठाणे (कळवा): 84 रुपये
नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी (NECC) मुंबई झोनचे उपाध्यक्ष राजू शेवाळे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, दक्षिण भारतात उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे अंड्यांचा प्रति शेकडा (100) घाऊक दर 650 रुपयांपर्यंत पोहोचला असून, त्याचा दर लवकरच 700-725 रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. (हेही वाचा, Nutritional Diet: शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता पोषण आहारात मिळणार अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी)
हिवाळी टंचाई आणि सणासुदीची मागणी
उत्पादन क्षेत्रात वाढलेला स्थानिक वापर आणि ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर बेकिंगसाठी अंड्यांची वाढती मागणी, यामुळे अंड्यांच्या तुटवड्यात आणखीच भर पडली आहे. वांद्रे येथील एका किरकोळ विक्रेत्याने सांगितले की, उत्पादन स्त्रोताचा वापर वाढला आहे, ज्यामुळे मुंबईसाठी अंड्यांचा तुटवडा पाहायला मिळतो. संपूर्ण डिसेंबरमध्ये दर उच्च राहतील, अशी पुस्तीही त्याने जोडली. दुसऱ्या एका अंडी विक्रेत्याने सांगिले की, घाऊक अंडे किंमत 6.75 रुपये प्रति किंवा 675 रुपये प्रति 100 आहे, तर माझ्या दुकानात किरकोळ किंमत 88 रुपये प्रति डझन आहे. मात्र, वांद्रेतील काही दुकाने 108 रुपये किलोनेही अंडी विकत आहेत.
अल्पउत्पन्न गटातील ग्राहकांना मोठा फटका
अंड्यांचा तुटवडा आणि वाढत्या किंमतींचा कमी आणि मध्यम उत्पन्न गटांवर मोठा परिणाम होत आहे. कमी किमतीत उपलब्ध असलेला प्रथिने म्हणजेच प्रोटीन्सचा स्त्रोत त्यांना उपलब्ध होणे कमी झाले आहे. वाढणारा घरगुती खर्च आणि आहाराच्या भडकलेल्या किमती पाहता सामान्य कुटुंबांचे अंड्यांची खरेदी कमी प्रमाणात होत आहे. इतकी महागडी अंडी आपण खरेदी करावीत का? याबाबत अनेक लोक पुन्हा पुन्हा गांभीर्याने विचार करत आहेत.