Bhaubeej 2021: भाऊबीजेनिमित्त ओवाळणी आणि मेजवानी च्या ताटात ठेवण्यासाठी झटपट बनतील असे 6 गोडाचे पदार्थ

भाऊबीजेच्या निमित्ताने घरातील सारी मंडळी एकत्र जमतात आणि मोठ्या जल्लोषात बहिण-भावाची जोडी त्यांच्यातील जिव्हाळा जपण्यासाठी यम द्वितीयेचा आनंद सेलिब्रेट करतात.

मिठाई (Photo Credits: Wikimedia Commons)

भाऊबीज (Bhaubeej) या दिवाळी मधील अखेरच्या सणाने दीपावलीची (Deepavali) सांगता होते. बहिण-भावामधील विश्वासाचं, आनंदाचं, जिव्हाळ्याचं नातं जपण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. भाऊबीजे दिवशी बहिण भावाचं औक्षण करते आणि त्यांच्यामधील बंध कायम रहावा म्हणून प्रार्थना करते. मग या आनंदाच्या दिवसाच्या निमित्ताने घराघरात सारे कुटुंबीय एकत्र येतात. गोडाधोडाच्या पदार्थाने मेजवानी केली जाते. बहिण भाऊ एकमेकांना भेटवस्तू देतात. मग यावर्षी तुम्ही या आनंदाच्या दिवसाची रंगत जेवणाच्या ताटातही वाढवणार असाल तर तुमच्या भावासाठी बाजारातून विकत आणलेल्या गोडाच्या पदार्थांऐवजी घरीच काही पदार्थ झटपट बनवून ओवाळणीच्या ताटात आणि मेजवानीच्या पानातही वाढु शकता. नक्की वाचा: Bhaubeej 2021 Tika Muhurat: भाऊबीज दिवशी भावाच्या औक्षणासाठी पहा काय आहे शुभ मुहूर्ता ची वेळ .

भाऊबीजेनिमित्त गोडाचे पदार्थ

श्रीखंड

सण म्हटला तर तो गोडाच्या पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. श्रीखंड हा असा एक पदार्थ आहे जो झटपट आणि मोठ्या प्रमाणात सहज केला जाऊ शकतो. अगदीच आयत्या वेळेस करायचा असेल तर तुम्ही चक्का बाजारातून विकत आणून तो साखरेसोबत फेटून घ्या. वेलची, केशर, पिस्ता, बदाम ज्या फ्लेवर मध्ये तुम्हांला श्रीखंड बनवायचे आहे ते बनवू शकता.

खोबर्‍याचे लाडू

भाऊबीजेपूर्वी दिवाळी निमित्त सणामध्ये नारळ ठेवला जातो. तो नारळ तुम्हांला जेवणात किंवा गोडाच्या पदार्थांमध्ये वापरायचा असेल तर खोबर्‍याचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. कंडेन्स मिल्क किंवा पाकामध्ये नारळाचा किस मिसळून तुम्ही खोबर्‍याचे लाडू बनवू शकता.

अ‍ॅपल रबडी

लक्ष्मीपूजनाच्या निमित्त घरात खूप फळं असतात. फळांचा रबडी मध्ये समावेश करून तुम्ही अ‍ॅपल रबडी सहज बनवू शकता. दूध आटवून बनवलेल्या रबडीत अ‍ॅपल म्हणजेच सफरचंदाचे बारीक तुकडे मिसळून तुम्ही चविष्ट अ‍ॅपल रबडी बनवू शकता.

गुलाबजाम विथ बेक्ड योगर्ड

एरवी नुकते गुलामजाम आपण अनेकदा खाल्ले असतील पण त्याला थोडा ट्विस्ट देण्यासाठी शॉर्ट ग्लास मध्ये फेटलेलं क्रीम, कंडेन्स मिल्क, दही एकत्र करा. ग्लासमध्ये अर्ध भरा. त्यावर गुलाबजाम टाकून बेक करा. थोड्या वेळाने त्यावर श्रीखंड टाकून सर्व्ह करू शकता.

काजू पिस्ता रोल

काजू पिस्ता रोल साठी या सुकामेव्यांची पूड आणि पिठीसाखर एकत्र करून शिजवा. मिश्रण ओलं असतानाच बटर पेपर वर थापून त्याचया वड्या करा. सिल्वर वर्ख सोबत सजवून सर्व्ह करा.

खव्याची बर्फी

खवा हा सणासुदीच्या काळात हमखास घराघरात गोडाच्या पदार्थांमध्ये वापरला जातो. खव्याची बर्फी करण्यासाठी तूप, साखर, खवा आणि ड्राय फ्रुट पावडर एकत्र करा आणि बर्फी बनवा.

हिंदू पुराणातील कथांनुसार, मृत्यूदेव यम हे आपली बहीण यमी हिच्याकडे जाऊन तिला वस्त्रालंकार देऊन , भोजनाचा आनंद घेऊन आले होते तो दिवस म्हणजे यमद्वितिया. त्यामुळे आजही भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन या दिवसाचा जिव्हाळा जपतो. बहिणीकडे जेवण करून, ओवाळणी करून घेऊन तिला भेटवस्तू देऊन त्यांच्यामधील नात्याचा गोडवा वृद्धिंगत करतो. यासाठी प्रार्थना केली जाते.