Vat Purnima Vrat 2020: वटपौर्णिमा साजरी करताना कोरोना व्हायरसच्या संकटाचे ठेवा भान; पूजा करताना घ्या 'अशी' खास काळजी
मात्र पूजेला जाताना सुद्धा योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
वटपौर्णिमा (Vat Purnima) सण यंदा 5 जून रोजी साजरा होणार आहे. हिंदु कालदर्शिकेनुसार ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीपासून तीन दिवस उपवास ठेवून वट सावित्रीचं व्रत केलं जातं. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास, वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात. वडाच्या झाडाचे पूजन करून सात जन्मी हाच पती मिळावा अशी इच्छा या निमित्ताने सुवासिनी व्यक्त करत असतात. यमाला हरवून सत्यवानाचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. यंदा कोरोनाच्या (Coronavirus) संकटामुळे सर्व सण आणि उत्सव घरीच साजरे करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. मात्र आता हळूहळू लॉकडाऊन (Lockdown) कमी केले जात आहे. यामुळे जर का तुम्ही राहात असणारा भाग कंटेनमेंट झोन नसेल (Containment Zone) आणि तुम्हाला अगदी सहज बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य असेल तरच बाहेर पडावे. मात्र पूजेला जाताना सुद्धा योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
वटपौर्णिमा सणाची पूजाविधी तर आपल्याला ठाऊक असेलच पण यावेळी स्वतःची काळजी घेण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे आपण आता जाणून घेऊयात ..Vat Purnima Vrat 2020: वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या
वटपौर्णिमा पूजा करायला बाहेर पडत असाल तर अशी घ्या काळजी
-झाडाभोवती गर्दी करु नये. निदान दोन फुट अंतर ठेवा.
- शक्य असल्यास सकाळी लवकर जाऊन पूजा करून घ्यावी जेणेकरून गर्दीच्या वेळी आधीच तुम्ही घरी आलेल्या असाल.
- मास्क लावून पूजा करावी.
- वाण देताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करायला विसरू नका.
- फोटो काढत बसू नका.
दरम्यान, जर का तुम्हाला इतक्या सहजपणे बाहेर जाणे शक्य होणार नसेल तर यंदा विधीवत उपवास करुन सुद्धा तुम्ही सण साजरा करू शकता. झाडाच्या फांद्या तोडून घरात सण करणे मात्र नक्की टाळा. गोडाधोडाचे जेवण करून, पतीसोबत वेळ घालवून जर तुम्ही सण साजरा केला तर यामार्गी तुमच्यातील जवळीक आणखीन वाढू शकते. आणि हाच या सणाचा मुख्य हेतू आहे नाही का?