Vaikuntha Ekadashi 2020: वैकुंठ एकादशी निमित्त जीवनचक्रातुन मुक्ती मिळण्यासाठी केली जाते प्रार्थना;जाणुन घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व
यादिवशी जो व्यक्ती मनोभावे श्री विष्णूची (Lord Vishnu) आराधना करतो त्याला मृत्यूनंतर वैकुंठाचे दार उघडते असे मानले जाते.
Vaikuntha Ekadashi 2020: जीवन चक्रातून, सुख दुःखाच्या फेऱ्यातून, आजारातून, अपेक्षातून मुक्ती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, आपल्याला मृत्यूपश्चात वैकुंठ्वास मिळावा आणि नरक यातना सहन कराव्या लागू नयेत यासाठी आपल्या हयातीत चांगली वागणूक आणि कर्म करणे गरजेचे आहे. देवाधिक्यांची पूजा करून, गोरगरिबांना मदत करून हे पुण्य कमावता येते, असं म्हणतात, एकादशीच्या मुहूर्तावर पूजा आणि उपवास केल्यास आपोआप पुण्यराशीत वाढ होते, त्यातही आजची एकादशी ही खास वैकुंठ प्राप्ती साठीच केली जाणारी असल्याने याचे आवर्जून पालन केले जाते, हिंदू दिनदर्शिकेनुसार, आज 6 जानेवारी रोजी वैकुंठ एकादशी (Vaikunth Ekadashi) चा मुहूर्त आहे. यादिवशी जो व्यक्ती मनोभावे श्री विष्णूची (Lord Vishnu) आराधना करतो त्याला मृत्यूनंतर वैकुंठाचे दार उघडते असे मानले जाते. आजच्या या खास दिवशी कधी आणि कशी कराल विष्णूची पूजा तसेच या एकादशी मागील पौराणीक कथा आपण जाणून घेणार आहोत.
वैकुंठ एकादशी तिथी मुहूर्त
तिथी दिवस: 6 जानेवारी ते 7 जानेवारी
तिथी प्रारंभ: 6 जानेवारी, पहाटे 3 वाजून 6 मिनिटे
तिथी समाप्ती: 7 जानेवारी, पहाटे 4 वाजून 2 मिनिटे
वैकुंठ एकादशी पूजा विधी
सकाळी लवकर उठून प्रातःविधी आटोपून, स्वच्छ कपडे परिधान करावेत. काही वेळासाठी ध्यान करून विष्णू आणि लक्ष्मीचे नामस्मरण करावे. घरातील देवांची पूजा करून श्लोक पठण करावे. तसेच एकादशी तिथी प्रारंभापासून इच्छुकांनी उपवास ठेवायचा असतो. तांदूळ, गहू, डाळ, मसाले आणि काही वेळा तर पाणी सुद्धा या उपवासात वर्ज्य असते. काही जण साबुदाण्याची खिचडी, कुट्टू ची पुरी आणि फलाहार करून देखील उपवास ठेवतात. हा उपवास द्वादशीला म्हणजेचज दुसऱ्या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करून सोडावा.
वैकुंठ एकादशी कथा
हिंदू पुराणानुसार, मुरान नामक एका राक्षसाने भूतलावर धुडगूस घालतात सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली होती, त्याला रोखण्यासाठी सर्व देवांनी भगवान शंकराला विनंती केली. तसेच भगवान विष्णू यांना देखील याच कार्यासाठी विचारण्यात आले. विष्णूंनी ही विनंती मान्य केली आणि पुढे विष्णू विरुद्ध मुरान असे युद्ध झाले. या युद्धात एक दिवस मध्येच विष्णूंनी विश्रांती घेत नवीन शस्त्राची निर्मिती केली. मात्र यादिवशी मुररान याने अनपेक्षित हल्ला करून विष्णूला मारायचा प्रयत्न केला, या हल्य्याच्यावेळी एक स्त्रीशक्ती निमित्त होऊन तिने मुरान याचा वध केला. या स्त्रीवर खुश होऊन विष्णूने तिचे नाव एकादशी असे ठेवले तसेच तिला हे वरदान दिले ज्यातून ती जो कोणी व्यक्ती वैकुंठ एकादशी निंक्त उपवास आणि पूजा करेल त्याची जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती करू शकेल.
या कथेत आपण पहिले असेल की, मुरान राक्षसाच्या राजसी, तामसी वृत्तीला स्त्रीच्या सात्विक वृत्तीने संपवले होते, वास्तविक कोणत्याही दिवशी उपवास केल्याने आपल्या वागणुकीत सात्विक भाव येतो आणि म्ह्णूनच स्पर्धेच्या जगातील तामसी भाव काहीसा दूर होतो.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यामार्फत लेटेस्टली मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही.)