Shivpratap Din 2020: शिवप्रताप दिन यंदा प्रतापगडावर कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार साजरा; शिवप्रेमींना गडावर येण्यास मज्जाव
तर वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या (Pratapgarh Utsav Samiti) वतीने व इतर साजरे होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
शिव प्रताप दिन (Shivpratap Din) हा 10 नोव्हेंबर दिवशी तारखेप्रमाणे साजरा केला जातो. तर तिथीनुसार या दिवसाचा सोहळा मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी दिवशी असतो. त्यामुळे आज (21 डिसेंबर) अनेक शिवप्रेमींसाठी तिथीनुसार शिव प्रताप दिन आहे. परंतू राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्याला ब्रेक लावण्यात आला आहे. सातारा जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार यंदा शिव प्रताप दिन यंदा केवळ प्रतापगडावर साजरा करण्यात येणार आहे. तर वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या (Pratapgarh Utsav Samiti) वतीने व इतर साजरे होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार असल्याने सामान्य शिवप्रेमींंना गडावर प्रवेशबंदी असेल. Shiv Pratap Din 2020: 10 नोव्हेंबर हा दिवस 'शिवप्रताप दिन' म्हणून का साजरा केला जातो?
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटी दरम्यान दगा फटका होत असल्याचा अंदाज आल्यानंतर महाराजांनी अफजल खानचा गडाच्या पायथ्याशी वध केला होता. या पराक्रमाची आठवण म्हणून शिव प्रताप दिन साजरा करण्याची प्रथा आहे. आज शिवप्रताप दिनी प्रतापगडावर साजरे केले जाणारे धार्मिक कार्यक्रम पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे अत्यंत साधेपणाने आणि कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. प्रतापगडावर देवीची पुजा, ध्वजारोहण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक आणि पुष्पहार अर्पण करून पालखी काढून शासकीय कार्यक्रम पार पडणार आहेत.
दरम्यान शासकीय कार्यक्रमांसोबत वाई मध्ये प्रतापगड उत्सव समिती देखील कार्यक्रम आयोजित करत असते. मात्र यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हा दिवसानिमित्त मोठे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळा देखील रद्द झाला आहे.